‘चाय-बिस्कुट’ खातील, पण ‘ते’ प्रामाणिकपणा विकणार नाही : रोहित पवार

मुंबई :

सध्या काही माध्यमांच्या एकांगी भूमिकेमुळे लोक आणि नेतेमंडळी त्यांच्यावर शंका उपस्थित करत आहेत. एकूणच सध्या माध्यमांची सोशल मिडीयावर उडवली जाणारी खिल्ली पाहून माध्यमे खरच आपली भूमिका पार पाडत आहेत का? अशी शंका यायला निश्चितच वाव आहे. राजकीय विषयापलीकडे जाऊन हाथरस, सुशांतसिंग मृत्यू प्रकरण या प्रकरणीसुद्धा काही माध्यमांनी एकांगी भूमिका घेतल्याचा आरोप होत आहे. अशातच राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी ‘चाय-बिस्कुट’ खातील, पण मराठी पत्रकार प्रामाणिकपणा विकणार नाहीत’, असे म्हणत मराठी पत्रकारांवरील विश्वास व्यक्त केला.

विशिष्ट माध्यम संस्थांकडून केली जाणारी पत्रकारिता पाहिली तर ती कोणत्या दिशेला चाललीय?, असाही सवाल यावेळी पवारांनी व्यक्त केला आहे. रिपब्लिक टीव्हीचे अर्नब गोस्वामी यांचा व्हिडीओ पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  

नेमकं काय म्हटलं आहे रोहित पवारांनी :-

भारतीय पत्रकारिता ही उच्च मूल्ये असलेली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात टिळक, आगरकर यांच्या जहाल पत्रकारितेचा सिंहाचा वाटा आहे. पण गेल्या काही काळातील घटनांवरून विशिष्ट माध्यम संस्थांकडून केली जाणारी पत्रकारिता पाहिली तर ती कोणत्या दिशेला चाललीय? असा प्रश्न पडतो.

आधी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या आणि आता हाथरस मधील घटनेवरून हे अधिक प्रकर्षाने जाणवतंय.

एकतर सरकारकडून हाथरस मधील पीडितेच्या कुटुंबाला गुन्हेगारांसारखी वागणूक मिळतेय. त्यांना घरात बंद करुन त्यांच्याकडील फोन हिसकावून घेतलेत आणि संपूर्ण गावाला पोलीस छावणीचं स्वरुप दिलंय. का तर पीडित कुटुंबाला कुणी भेटू नये म्हणून. एवढंच नाही तर तिथं जाणाऱ्या खासदारांनाही मारहाण केली जातेय. पत्रकारांचे फोन टॅप करुन दिशाभूल करणारे ऑडिओ फिरवले जात आहेत, याला काय म्हणावं?

आणि काही माध्यमांचा हा बेशरमपणा पहा…

पीडितेची बातमी दाखवण्याऐवजी खोट्या बातम्या तयार करण्याची नवीन पत्रकारीताच त्यांनी सुरू केलीय. ते तुम्ही सोबतच्या व्हिडीओत पाहू शकता. याला पत्रकारितेऐवजी सर्कस म्हणणंच अधिक संयुक्तिक ठरेल. यापेक्षा कितीतरी अधिक उत्तम माझे मराठी आणि महाराष्ट्रात काम करणारे इतर पत्रकार मित्र आहेत. जे ‘चाय-बिस्कुट’ खाऊन राहतील पण आपला प्रामाणिकपणा कधीही विकत नाहीत. अर्थात यामध्ये प्रतिमा मिश्रा या हिंदी माध्यमाच्या पत्रकार भगिनीची कामगिरीही अभिमान वाटावी, अशी आहे. त्यामुळं आभाळ फाटलंय पण शिवणारेही खंबीर आहेत, असंच म्हणावं लागेल.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here