आरक्षणासाठी ‘या’ समाजाचे अनोखे आंदोलन; सांगलीत हलगीवादन तर नाशिकमध्ये जागरण गोंधळ

सांगली:

आरक्षणासाठी मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी राज्यभर आंदोलने करण्यात आली. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या निवासस्थानासमोर मराठा क्रांती मोर्चानेे हलगीवादन केेले. तर नाशिक येेेथे मराठा समाजाच्या वतीने भाजपा कार्यालयसमोर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले.  “तुमचं आमचं नात काय, जय जिजाऊ जय शिवराय,” असे म्हणत शुक्रवारी मराठा क्रांती मोर्चाने जयंत पाटील यांच्या घरासमोर तब्बल अर्धा तास हलगीचा कडकडाट केला. इस्लामपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सर्व प्रमुख कार्यकर्ते जमले होते. छत्रपती शिवरायांना अभिवादन करून या कार्यकर्त्यांनी कारखाना कार्यस्थळावरील जयंत पाटील यांच्या बंगल्याकडे आगेकूच केली.

याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र तरीही मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यानी तेथे तळ ठोकत घोषणाबाजी केली. हलगीचा ठेका धरला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, शहर युवकचे कार्याध्यक्ष स्वरूप मोरे यांनी आंदोलकांची भेट घेऊन मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांच्याही निवासस्थानी हलगी वाजवत त्यांच्या पाठिंब्याचे पत्र घेत शिराळा तालुक्यात प्रयाण केले. या आंदोलनात मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलास देसाई, डॉ.संजय पाटील, दिग्विजय पाटील, धनंजय शिंदे, संतोष माने, उमेश कुरळपकर, डॉ.अमित सूर्यवंशी, माणिक मोरे, विजय महाडिक, अशोक कोकलेकर, विजय धुमाळ, सुहास पाटील, दिग्विजय मोहिते, उमेश शेवाळे, रामभाऊ कचरे, अतुल पाटील, शरद बारवडे यांनी सहभाग घेतला.  नाशिक येथे मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावे या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी वसंत स्मृती येथील भाजपा कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन केले. दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार भारती पवार, भाजपाचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. त्यांना समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here