तर देशाचे सामाजिक ऐक्य कसे टिकणार : ‘त्या’ प्रकरणावरून शरद पवारांचा सवाल

मुंबई :

बाबरी मस्जिद प्रकरणावरून न्यायालयात जो न्याय झाला त्याबद्दल लोक अद्यापही शंका उपस्थित आहेत. अशातच देशाचे जेष्ठ नेते व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

नेमकं काय म्हटलं आहे पवारांनी :-

बाबरी मशीद विध्वंस प्रकरणीच्या निकालाबाबत मी न्यायमूर्तींबद्दल काही बोलणार नाही. पण काल मी श्री. माधव गोडबोले यांचे विधान टीव्हीवर ऐकले. ‘सगळ्या प्रकारचे पुरावे याठिकाणी दिल्याच्या नंतरही असा निर्णय होतो, याचं मला आश्चर्य वाटतं,’ हे उद्गार माधव गोडबोले यांचे होते.

ज्यावेळी बाबरी मशिदीच्या विध्वंसाचा प्रकार झाला त्यावेळी मी केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्री होतो, विषय माझा नव्हता. पण मला आठवतंय नरसिंह राव, शंकरराव चव्हाण आणि आम्हा सहकाऱ्यांच्या कानावर तेव्हाचे केंद्रीय गृहसचिव श्री. माधव गोडबोले यांनी काही वस्तुस्थिती घातली होती.

उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी अभिवचन दिलं होतं की या बाबरी मशिदीच्या वास्तूला धक्का बसणार नाही. पण हे अभिवचन पाळलं जाणार नाही, असं मत तेव्हाचे केंद्रीय गृह सचिव म्हणून माधव गोडबोले यांनी मांडलं होतं.

पण नरसिंह राव उत्तर प्रदेशच्या तेव्हाच्या राज्यप्रमुखांच्या विधानावर विश्वास ठेवला पाहिजे, या मताचे होते. त्यामुळे गोडबोलेंच्या मताचा स्वीकार झाला नाही. दुर्दैवाने त्याची परिणती जे गोडबोलेंना वाटत होतं त्यामध्येच झाली.

माधव गोडबोले केंद्रीय गृह सचिव असल्याने त्यांनी या प्रकरणाचा सखोल अभ्यास आधीच केला होता. नंतर काय होईल याचीही खात्री त्यांना होती व नंतर जे घडलं ते त्यांनी डोळ्याने पाहिलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाबाबत मनातली अस्वस्थता माध्यमांकडे नमूद केली त्याबद्दल मला आश्चर्य वाटलेलं नाही.

आता काशी, मथुरा अशीही चर्चा सुरू झाल्याची दिसते. त्यामुळे देशाचे सामाजिक ऐक्य कसे टिकणार याची काळजी आम्हा सगळ्यांनाच वाटते आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here