सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं मागितली माफी; वाचा, काय आहे प्रकरण

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात आज उत्तरप्रदेशमधील हाथरस प्रकरण आणि त्यानंतर त्याअनुषंगाने घडलेल्या घडामोडींवर भाष्य केले आहे. तसेच भाजप,पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.

वाचा, नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात :-

महाराष्ट्रातील पालघरात दोन साधू पुरुषांची जमावाने हत्या केली तेव्हा वेदनेने तळमळणाऱया योगींची विधाने आम्ही पाहिली आहेत. संपूर्ण भाजप तेव्हा हिंदुत्वाच्या नावाने शंख फुंकत होता. मग हाथरस, बलरामपूर प्रकरणात हा हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला आहे? योगींच्या राज्यात पोलिसांचे ‘ऍण्टी-रोमिओ’ पथक तयार केले आहे. बागेत प्रेम करणाऱया तरुण-तरुणींना पोलीस लखनौ, कानपुरात मारतात, पण मुलींचे बलात्कार करून खून करण्याची पूर्ण मुभा आहे. मुंबईत सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या की खून यावर भाजप प्रवक्त्यांनी वाहिन्यांवर चर्चा रंगवल्या, पण हाथरसच्या कन्येवर बलात्कार झालाच नाही यासाठी हे सर्व लोक वकिलीकौशल्य पणास लावत आहेत. हे संतापजनक आहे. त्या मुलीने बलात्कार झाल्याचे कॅमेऱयासमोर सांगितले. त्या मृत्यूपूर्व जबानीस काहीच अर्थ नाही काय? त्या मुलीच्या अब्रूचे रक्षण करता आले नाही व तिचे प्राणही वाचवता आले नाहीत अशा उत्तर प्रदेश पोलिसांनी हाथरसला निघालेल्या राहुल गांधींवर मात्र हल्ला केला आहे. हे कायद्याला धरून नाही.

आम्हाला आश्चर्य वाटते ते उत्तर प्रदेशातील सर्व प्रमुख विरोधी पक्षांचे. राहुल गांधींवर पोलिसांचा हल्ला होत असताना ‘योगी’राज्यातील तमाम विरोधी पक्ष संस्कृती व कायद्याचे हे वस्त्रहरण उघडय़ा डोळय़ांनी पाहत होते. मुंबईत एका नटीचे बेकायदा बांधकाम कायद्याने तोडले म्हणून ‘कर्कश’ मीडियाचे अँकर्सही आज तोंडात बोळे कोंबून बसले आहेत. देश इतका निर्जीव, हतबल कधीच झाला नव्हता. चारशे-पाचशे वर्षांपूर्वीची बाबरी पाडली म्हणून पेटलेला हा देश एका मुलीच्या देहाची विटंबना होऊनही थंड पडला असेल तर या देशाने सत्त्व गमावले आहे, समाज नपुंसक बनला आहे व मतदार गुलाम झाला आहे. हाथरसच्या मातीत राख होऊन हुंदके देणाऱया ए अबले, आम्हाला माफ कर!

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here