‘ते’ कृत्य हिंदुत्वाच्या कोणत्या परंपरेत बसते; शिवसेनेचा त्यांना रोखठोक सवाल

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात आज उत्तरप्रदेशमधील हाथरस प्रकरण आणि त्यानंतर त्याअनुषंगाने घडलेल्या घडामोडींवर भाष्य केले आहे. तसेच भाजप,पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.

वाचा, नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात :-

”महिलांवरील बलात्कार, अत्याचारांबाबत आवाज उठवाल तर याद राखा” असेच जणू योगी सरकारने बजावले आहे. हाथरसच्या एका गावात पीडित महिलेच्या माता-पित्यांना पोलिसांनी कोंडून ठेवले आहे. संपूर्ण गाव बंदूकधारी पोलिसांनी घेरून ठेवले आहे. जिल्हाधिकारी पीडितेच्या कुटुंबीयांना सरळ सरळ धमकावत असल्याची टेप समोर आली आहे. ”आज हे मीडियावाले गावात आहेत. ते दोन दिवसांत जाणारच आहेत. मग तुम्ही काय करणार? तुम्हाला आमच्याशीच बोलावे लागेल. तेव्हा आता तोंड बंद ठेवा!” असे धमकावणाऱया अधिकाऱयांनी माणुसकीला काळिमा फासला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे संन्यासी आहेत. ते भगव्या कपडय़ांत वावरतात. पंतप्रधान मोदी हे तर फकीर आहेत, पण मोदी यांना जगातील सर्वोच्च दर्जाची सुरक्षा आहे. योगी यांनाही मोठी सुरक्षा आहे. अखिलेश सरकारने एकदा योगींची सुरक्षा मागे घेतली तेव्हा संसदेच्या सभागृहात याच योगी महाराजांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. आज तेच योगी मुख्यमंत्री आहेत, पण अबलांना, मातांना सुरक्षा नाही. बलात्काराने विटंबना झालेले अबलांचे मृतदेह पोलीस पेट्रोल ओतून जाळत आहेत. हे नराधम कृत्य हिंदुत्वाच्या कोणत्या परंपरेत बसते? मृतदेहाची विटंबना करू नका, मृतदेहांनाही सन्मानाने अंत्यसंस्कार होण्याचा अधिकार आहे, पण मृतदेह पेट्रोल ओतून कोणत्याही रूढी-परंपरेशिवाय जाळले जात असतील तर ती महिला देहाची, हिंदू संस्कृतीची विटंबनाच आहे. अयोध्येतील सीतामाईही आज भयाने, वेदनेने धरणीत गडप झाली असेल.

संपादन :विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here