ते तर ‘गँगरेप’ होत असल्याचेच लक्षण; शिवसेनेचा हल्लाबोल

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात आज उत्तरप्रदेशमधील हाथरस प्रकरण आणि त्यानंतर त्याअनुषंगाने घडलेल्या घडामोडींवर भाष्य केले आहे. तसेच भाजप,पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.

वाचा, नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात :-

उत्तर प्रदेशातील अयोध्येत राममंदिराची पायाभरणी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाली आहे, पण उत्तर प्रदेशात ‘रामराज्य’ वगैरे नसून कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत ‘जंगलराज’ आहे. महिलांवर अत्याचार सुरूच आहेत, पण तरुणींवर बलात्कार आणि खून करण्याच्या घटना योगींच्या राज्यात वाढल्या आहेत. हाथरसमध्ये 19 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार व नंतर खून झाला. त्यानंतर देशात गदारोळ उडाला आहे. मरणाच्या दारात असताना तिने बलात्कार झाल्याचे सांगितले.

आता उत्तर प्रदेशचे सरकार म्हणते बलात्कार वगैरे सगळे झूठ आहे. पाठोपाठ बलरामपूरमध्येही सामूहिक बलात्काराचे प्रकरण झाले, पण ना दिल्लीतील अश्रूंचा बांध फुटला ना योगी सरकारच्या डोळय़ांच्या कडा ओलावल्या. बलात्कार झालाच नाही तर विरोधकांनी बोंबलायचे कशाला? असे सरकारच बोंबलत आहे. बलात्कार झालाच नाही, तर रात्रीच्या अंधारात त्या तरुणीचा मृतदेह पोलिसांनी पेट्रोल ओतून का जाळला? पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटायला निघालेल्या राहुल गांधी यांना अडवलेच, पण त्यांना कॉलर पकडून धक्काबुक्की केली, जमिनीवर पाडले.

देशातील एका प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यास असे वागवणे, अपमानित करणे हे लोकशाहीवर ‘गँगरेप’ होत असल्याचेच लक्षण आहे. राहुल गांधी हे राष्ट्रीय काँगेसचे माजी अध्यक्ष आहेत. राहुल गांधी हे महान इंदिरा गांधींचे नातू व तडफदार राजीव गांधींचे सुपुत्र आहेत. इंदिरा व राजीव गांधी यांनी देशाच्या सार्वभौमत्वासाठी हौतात्म्य पत्करले, पण देशासाठी रक्त तर सोडाच, घामाचा, त्यागाचा एक थेंबही ज्यांनी सांडला नाही अशा सत्ताधीशांच्या आदेशाने राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्यात आला.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here