‘त्याचा’ काळाबाजार आणि वाढते मृत्यू रोखण्याचे आवाहन; पहा काय पत्र दिलेय फडणवीसांनी

महाराष्ट्रात रेमडेसिवीरची प्रचंड टंचाई असून, परिणामी मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. गरिब रूग्णांचे अतोनात हाल होऊन  त्यांचे मृत्यू होत आहेत. अशावेळी तातडीने हस्तक्षेप करीत गरीब रुग्णांना खाजगी आणि सरकारी रुग्णालयात हे औषध मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

पत्रात फडणवीस यांनी म्हटले आहे की, प्रतिदिन सरासरी सुमारे 20 हजार कोरोना रुग्णांची भर पडत असतानाच सरासरी 450 बळी रोज वाढत आहेत. तसेच उपचारातील एक महत्वाचे औषध असलेले रेमडेसिवीर हे काही जिल्ह्यांमध्ये मिळात नाही. सरकार याच्या उपलब्धतेचे कितीही दावे करीत असले तरी रूग्णालयांकडून मात्र टंचाईचेच कारण रूग्णांना सांगितले जाते. हे सामान्यांच्या आवाक्यात नाही. परिणामी त्यांचे मृत्यू होण्याचेही प्रमाण वाढले आहे.

रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी राज्य सरकारने राबवलेली प्रक्रिया सदोष असल्याने अनेक जिल्ह्यातून खरेदी केलेला औषध साठा परत करावा लागला. वृत्त माध्यमांमध्ये याच्या बातम्याही आलेल्या आहेत. प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. त्यामुळे नवीन खरेदी प्रक्रिया राबवून जिल्हा प्रशासनांना हा साठा तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच सर्व गरीब रुग्णांना सरकारी तसेच खाजगी रुग्णालयात सुद्धा रेमडेसिवीर मोफत उपलब्ध करून देण्यात यावे. याबाबत तातडीने आपण निर्देश प्रशासनाला द्यावेत आणि गरिब रूग्णांचे प्राण वाचवावे, असेही या पत्रात म्हटले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here