मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावर पार्थ पवार एकाकी; अजितदादांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण

युवा नेते पार्थ पवार यांनी मराठा आंदोलनाची ज्वलंत मशाल घेण्यास तयारी दाखवली होती. त्यासाठी न्यायालयात जाण्याचे त्यांनी ट्विटरवर म्हटले होते. त्या मताचा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा काहीही संबंध नसल्याचे पार्थ यांचे वडील आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी स्पष्ट केले आहे.

‘मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या विवेकची बातमी ऐकून धक्का बसला. अशा दुर्दैवी घटनांची साखळी सुरु होण्यापूर्वी मराठा नेत्यांना जागं व्हावं लागेल आणि त्यासाठी संघर्ष करावा लागेल. हे संकट सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पावलं उचलायला हवी’, असे आवाहन पार्थ पवार यांनी केले होते.

तसेच त्यांनी पुढे म्हटले होते की, विवेकने आपल्या मनात प्रज्वलित केलेली ज्योत संपूर्ण यंत्रणा पेटवू शकते. संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आलं आहे. मराठा आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही.मी मराठा आंदोलनाची ज्वलंत मशाल घेण्यास तयार आहे. विवेक आणि इतर कोट्यवधी असहाय्य ‘विवेक’साठी न्यायाचं दार ठोठावण्यासाठी तयार आहे. जय हिंद. जय महाराष्ट्र.’

यावर प्रतिक्रिया देताना अजितदादांनी म्हटले आहे की, ‘माझी बहिण सुप्रिया सुळे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की ती राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नाही. आता अलिकडची मुलं काय ट्वीट करतात. मग प्रत्येकवेळी तुम्ही विचारता तुमच्या मुलाने हे ट्वीट केलं, तुमच्या मुलाने ते ट्वीट केलं. मला तेवढाच उद्योग नाही. मला राज्यात अनेक प्रकारची जबाबदारी असते. जो-तो स्वतंत्र विचाराचा असतो आणि प्रत्येकाने काय ट्वीट करायचं हा ज्याला-त्याला अधिकार असतो. पण मराठा समाजाला असेल किंवा धनगर समाजाला असेल, ज्याला-त्याला आपला न्याय्य हक्क मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे.’

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here