नवीन कृषी विधेयकाला नगर जिल्ह्यातूनही वाढता विरोध; शेतकरी उतरले रस्त्यावर

अहमदनगर :

बाजार समित्यांमधून शेतकऱ्यांच्या कृषी मालाची विक्री होते. मात्र, केंद्र सरकारने या बाजार समित्याच मोडीत काढण्याचा घाट घातला आहे, असा आरोप करीत शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. देशभरात शेतकरी रस्त्यावर उतरुन आंदोलन करीत आहेत. अनेक ठिकाणी या आंदोलनांना हिंसक वळणदेखील मिळाले आहे. नगर जिल्ह्यातील शेतकरीही रस्त्यावर उतरुन नवीन कृषी विधेयकाला विरोध करीत आहेत.संगमनेर येथे शुक्रवारी सकाळीच मोठा मोर्चा काढण्यात आला. यात केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र सरकारच्या निषेधाचे फलक हातात घेत अनेक शेतकरी, काँग्रेस कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले. संगनेर काँग्रेसच्यावतीने हा मोर्चा काढण्यात आला. नवीन कृषी विधेयक तात्काळ रद्द करावे, अशी मागणी या मोर्चात करण्यात आली.

संगमनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरुन हा मोर्चा सुरु झाला. तेथून नंतर हा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर पोहोचला. या मोर्चाचे नेतृत्व नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी केले. ‘भाजपा हटाओ, एमएसपी बचाओ,’ ‘किसान बचाओ, देश बचाओ,’ ‘भाजपाला हटवा लोकशाही वाचवा’, अशा घोषणा देत हा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर पोहोचला. तेथे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले व नवीन कृषी विधेयक मागे घेण्याची मागणी करण्यात आली. हे विधेयक मागे न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे़.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here