बंदिस्त शेळीपालनाचे ‘हे’ आहेत फायदे-तोटे; वाचा आणि मगच योग्य निर्णय करा

सोशल मिडिया किंवा विविध बातम्यांमध्ये बंदिस्त शेळीपालन कसे खूप नफा देणारे आहे याचे दाखले मिळतात. तर, कृषी विद्यापीठ, संशोधन संस्था आणि पशुवैद्यकीय विषयाचे तज्ञ मात्र पूर्णपणे बंदिस्त अर्थात ठाणबंद शेळीपालन न करण्याचाच सल्ला देतात. अशावेळी आपला अनेकांचा समज होतो की, त्या एसीमध्ये बसणाऱ्यांचा सल्ला काय ऐकायचा. परंतु, वाचक मित्र-मैत्रिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या. भले त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज जरासे कमी असेल. मात्र, त्यांचा सल्ला पूर्णपणे दुर्लक्ष करण्याजोगा नक्कीच नाही. त्यामुळेच दोन्ही बाजूंचे सल्ले आणि आपला अभ्यास याची जोड देऊन आपल्याला कोणत्या पद्धतीने शेळीपालन करायचे आहे त्याचे नियोजन करा.

राहुरी (जि. अहमदनगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठानेही याबाबतीत काही टिप्स दिलेल्या आहेत. तसेच आतापर्यंत शेकडो शेळीपालकांनी आपल्या व्यथा, अडचणी आणि यशकथा सांगितलेल्या आहेत. त्यापैकी प्रॅक्टिकल नॉलेज देणाऱ्यांच्या माहितीवरच निर्णय घ्यावा. पैदाशीच्या शेळ्या किंवा बोकड विकून पैसे कमावणाऱ्या व्यावसायिकांचा सल्ला व मार्गदर्शन न घेता अशावेळी खरी माहिती देणारा एखादा गोठेवाला शोधून त्यांचे प्रॅक्टिकल नॉलेज आत्मसात करा.

आपण सुरुवातीला बंदिस्त शेळीपालन याचे फायदे पाहूया :

  1. शेळी हा कमी जागेत व कमी चाऱ्याच्या मदतीने वाढवण्याजोगा प्राणी आहे. त्यामुळे गोठ्यात त्यांचे संगोपन करणे शक्य आहे.
  2. गोठ्यात संगोपन केल्याने यावरील मनुष्यबळ खर्च कमी होतो. तसेच कमी जागेत व कमी श्रम खर्ची करून जास्त शेळ्यांचे संगोपन करता येते.
  3. हिरवा चार, वैरण व खुराक यांचे योग्य प्रमाण आणि क्षारविटा गोठ्यात टांगत्या ठेऊन शेळीपालन करणे शक्य आहे.
  4. बंदिस्त पद्धतीने नियोजन करताना एकाचवेळी सर्व शेळ्या माजावर आणून मार्केटिंग व्यवस्थापनाला मदत होते.
  5. शेळ्या चरण्यासाठी सोडाव्या लागत नसल्याने गावातील व परिसरातील कुरण टिकून राहते. पर्यावरण संवर्धनाला यामुळे हातभार लागतो. चराऊ जमीन कमी होत असल्याने हा एक चांगला पर्याय आहे.

आता बंदिस्त शेळीपालन याचे तोटे किंवा धोके पाहूयात :

  1. शेळी हा मनमौजी प्राणी आहे. त्याला काहीही वेगवेगळे खायला आणि उंडारायला आवडते. बंदिस्त गोठ्यात तसे शक्य होत नाही. एकूणच शेळीच्या हालचाली व खाण्याच्या सवयीवर याचे परिणाम होतात.
  2. बाहेर चारताना कोणत्याही वनस्पती खाणारी शेळी इथे मात्र, ठरलेला हिरवा चार, वैरण व खुराक यामध्येच अडकते. परिणामी त्यांचे सकस आहाराच्या कमतरतेमुळे योग्य पोषण होण्यास मर्यादा येतात.
  3. खाण्यामध्ये सकस चारा येण्यास अडचणी येत असल्याने मग अशावेळी त्यांना इतर काही आरोग्याच्या समस्या व आजार होऊ शकतात. अशावेळी मग त्याची कमतरता भरून काढण्यासाठी औषधोपचार आणि खाद्य यावरील खर्च वाढून उत्पादन-खर्चात वाढ होते.
  4. बंदिस्त गोठा उभारणे, आरोग्यासाठीचा खर्च आणि एकूण व्यवस्थापन यामध्ये झालेला खर्च लक्षात घेता यामध्ये मिळणारा नफा परंपरागत पद्धतीपेक्षा कमी असतो.
  5. यामध्ये शेळ्या किंवा बोकड जास्त प्रमाणात आजारी पडण्याची शक्यता असते. तसेच त्यांच्यामध्ये एकमेकांना मारण्याचे प्रमाणही तुलनेने वाढते. अनेकदा तर प्राण्यांची मर बंदिस्त गोठ्यामध्ये जास्त होते.

एकूणच सर्व गोष्टींचा साकल्याने अभ्यास केल्यावर असे दिसते की, जिथे चराऊ कुरण किंवा जमीन उपलब्ध नाही आश्च ठिकाणी ठाणबंद शेळीपालन करावे. कारण, यामध्ये गुंतवणूक आणि खर्च मोठा आहे, तर नफा त्या तुलनेत कमी आहे.

(क्रमशः)

संपादन व लेखन : सचिन मोहन चोभे

वाचक बंधू-भगिनींनो, आपण ‘कृषीरंग’वर दररोज शेळीपालन (Goat Farming) या विषयावरील माहितीची मालिका प्रसिद्ध करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीसह जगभरातील गोट फार्मिंग ट्रेंड आणि संशोधन याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. सध्या या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आल्याच्या बातम्या माध्यमांतून येतात. अशावेळी या व्यवसायाचे वास्तव आणि व्यावहारिक भान देण्याचा हा प्रयत्न आहे. आपणास कोणत्याही सूचना व मार्गदर्शन करावेसे वाटल्यास krushirang@gmail.com या इमेलद्वारे आपण आम्हाला संपर्क करू शकता. तसेच नियमित बातम्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय न्यूज अपडेट आणि कृषी-ग्रामीण विकासाची माहिती पाहण्यासाठी आमचे www.facebook.com/Krushirang (कृषीरंग) हे फेसबुक पेज लाईक व फॉलो करा. ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना माहितीसाठी शेअर करा. @टीम कृषीरंग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here