पार्थ पवारांच्या ‘त्या’ ट्विटवर अजित पवारांची प्रतिक्रिया; ‘मला तेवढाच उद्योग नाही’

मुंबई :

पार्थ अजित पवार हे आपल्या ट्वीट तसेच पक्षविरोधी भूमिकांमुळे नेहमीच चर्चेत असतात. मराठा आरक्षणाप्रश्नी त्यांनी ट्वीट करत नव्या वादाला तोंड फोडले होते. या ट्वीटविषयी अजित पवारांना विचारताच ‘प्रत्येक वेळेस तुमच्या मुलाने हे ट्विट केलं विचारलं जातं, मला तेवढाच उद्योग नाही. राज्यातील अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या माझ्याकडे आहेत’, असे उत्तर उपमुख्यमंत्री पवारांनी दिले.

पुढे ते म्हणाले की, जो तो स्वतंत्र विचाराचा असतो, प्रत्येकाला काय ट्विट करावं याचा अधिकार असतो. माझी बहिण खासदार सुप्रिया सुळेंनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण किंवा इतर घटकांचं आरक्षण असेल ज्याला त्याला आपल्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे.

पार्थ यांच्या ट्वीटविषयी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नाही हे आम्ही सांगितलेलं आहे. अलीकडची मुलं काही ट्विट करतात. त्यामुळे माझ्याकडे तेवढाच उद्योग नाही.

नेमकं काय म्हटलं होतं पार्थ पवार यांनी :-

मराठा आरक्षणासाठी विवेकने आत्महत्या केल्याची बातमी ऐकून धक्का बसला आहे. अशा दुर्दैवी घटनांची मालिका सुरु होण्याआधी मराठा नेत्यांनी जाग व्हावं आणि लढावं. महाराष्ट्र सरकारने तोडगा काढण्यासाठी पावलं उचलावीत.   

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here