विवेक राहाडेच्या आत्महत्येनंतर संभाजीराजेंनी केली महत्वाची पोस्ट; वाचा, काय म्हटलंय त्यांनी

मुंबई :

मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. अशातच एका १८ वर्षीय विद्यार्थ्याने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी आक्रमक असलेल्या संभाजीराजेंनी महत्वाची पोस्ट शेअर केली आहे.

‘मराठा आरक्षणाची अटीतटीची लढाई आपण लढत आहोत. कोणत्याही परिस्थितीत हा लढा असाच चालू राहील. आणि मला विश्वास आहे की आपण नक्की जिंकू! हा लढा सुरू असताना, युवकांनी आत्महत्या करू नयेत. आत्महत्या हा पर्याय अजिबात नाही. एक लक्षात ठेवा हा समाज, “लढून मरावं, मरून जगावं” हेच आम्हाला ठावं, असे पोवाडे गाणारा आहे. माझ्या शूर सरदारांनो खचून जाऊ नका. आज परिस्थिती जरी आपल्या विरोधात वाटत असली, अंधारात जात असलेली वाटत असली तरी, उद्या नक्की पहाट होईल. सर्व काही ठीक होईल. आपण लढाई जिंकूंच’, असा विश्वास खासदार संभाजीराजेंनी व्यक्त केला आहे.

पुढे त्यांनी म्हटले आहे की, माझ्या निडर वाघांनो तुम्हीच जर असे हातबल होऊन आत्मबलिदान देणार असाल, तर मला चांगलं वाटणार आहे का? या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. सर्वांना माझी नम्र विनंती आहे कोणीही असे पर्याय निवडू नयेत.

बीड मधील विवेक राहाडे या युवकाने समाजासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या परिवारा सोबत आमच्या संवेदना आहेत. घरातील कर्तृत्वाला आलेला युवक असा अकाली जाणं, ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे.

समाजासाठी बलीदान दिलेल्या या मावळ्याला विनम्र श्रध्दांजली..!

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here