बाबरीच्या निकालावर शिवसेनेचे मोठे भाष्य; वाचा, काय म्हटलेय सामनात

मुंबई :

१९९२ साली घडलेल्या बाबरी मस्जिद प्रकरणाची केस आजपर्यंत चालू होती. काल या प्रकरणाचा निकाल लागला. सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. याच विषयावर शिवसेनेने आज सामनाच्या माध्यमातून भाष्य केले आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-     

गेली तीन दशके देशाचं राजकारण आणि एकूणच जनमानस ढवळून काढणाऱ्या अयोध्या प्रकरणात आणखी एक चांगला निवाडा न्यायालयाने केला आहे. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील बाबरी मशिदीचा ढाचा उद्ध्वस्त केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या खटल्यातून भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह सर्व 32 आरोपींची लखनौच्या विशेष न्यायालयाने बुधवारी निर्दोष मुक्तता केली. फार खळखळ न करता किंवा माथी भडकवण्याचे उद्योग न करता न्यायालयाच्या या निकालाचे आता सर्वांनीच स्वागत करायला हवे. बाबरी मशीद उद्ध्वस्त होण्यामागे कुठलेही कट-कारस्थान न्यायालयास आढळले नाही. एपूण साक्षी आणि पुरावे पाहता बाबरी मशीद पाडण्यात हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांचा सहभाग असल्याचे किंवा बाबरी पाडण्यासाठी पूर्वनियोजित कट आखण्यात आल्याचे सिद्ध होत नाही, असा सुस्पष्ट निर्वाळाच न्यायालयाने दिला. अयोध्येतील रामजन्मभूमीच्या मुद्दय़ावर देशभर रथयात्रा काढून राममंदिराचा विषय ऐरणीवर आणणाऱया लालकृष्ण आडवाणी, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्यासह एपूण 49 जणांवर बाबरी पाडण्यासाठी गुन्हेगारी स्वरूपाचा कट आखल्याचा आरोप सीबीआयने ठेवला होता. कारसेवकांना भडकवणारी प्रक्षोभक भाषणे आणि वक्तव्ये करून या नेत्यांनी बाबरी मशीद पाडण्यासाठी चिथावणी दिली, असा ठपका सीबीआयने आरोपपत्रात ठेवला होता. हा आरोप शाबित झाला नाही. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान शिवसेनाप्रमुखांनी लखनौ न्यायालयात एकदा हजेरी लावली तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी करून लखनौच्या नागरिकांनी त्यांचे स्वागत केले होते.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here