कृषी विधेयक शेतकरी हिताचे, कॉंग्रेस दलालांचा पक्ष : पिंपळे

अहमदनगर :

2014 पासून मोदी सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींप्रमाणे शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत. लबाड कॉंग्रेस पक्ष हा शेतकर्‍यांच्या बाजूने कधीच नव्हता व आताही नाही. या पक्षाने कायम दलालांची पाठराखण केली आहे, असा आरोप भाजपच्या किसान मोर्चाचे राज्य कार्यकारिणी सदस्य रमेश पिंपळे यांनी केला. 

अधिक माहिती सांगताना पिंपळे यांनी सांगितले की, स्वामीनाथन आयोगाने कृषी क्षेत्रासाठी नवसंजीवनी मिळावी म्हणून 2006 साली केंद्र सरकारकडे काही शिफारशी केल्या होत्या. कॉंग्रेस सरकारने त्याची 2014 पर्यंत अंमलबजावणी केली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रत्येक मुद्यांचा अभ्यास करून शेतकर्‍याचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला. एमएसपीची अंमलबजावणी करून प्रत्येक खरीप व रब्बी पिकांचे भाव वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आपात्कालात पिक कर्जावरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेताना प्रधानमंत्री फसल बीमा योजना आणून शेतकर्‍यांना पूर्ण सरंक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजना आणून वर्षाला 6 हजार रूपये मदत देण्याचा निर्णय झाला. माती परिक्षण करण्यासाठी शेतकर्‍यांना जनजागृतीसाठी सरकारने विशेष मोहिम राबविली. फडणवीस सरकारच्या काळात 5 वर्षे बी बियाणे, खते यांच्या किंमती स्थिर होत्या. काळाबाजार झाला नाही. बी- बियाणे दर्जेदार मिळाले. कृषी सिंचनासाठी जलयुक्त शिवार योजनेमुळे क्रांतीकारी बदल पहायला मिळाले.

यावेळी पिंपळे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, आज ठाकरे सरकारच्या काळात काय स्थिती आहे, हे सर्वजण पाहत आहेत. केंद्राच्या नवीन कायद्यानुसार शेतकरी बाजार समिती किंवा बाहेरही आपला शेतमाल विकू शकतो. कॉन्टॅक्ट फार्मिंगमुळे तो नियोजीत शेती करू शकतो. स्पर्धा वाढल्याने शेतमालास चढा भाव मिळेल. एमएसपी असल्याने सररकारचेही नियंत्रण राहिल. त्यामुळे शेतकर्‍यांनी ज्यांनी आपली 70 वर्षे पिळवणूक केली, त्यांना ओळखावे.

कृषी स्वातंत्र्याची ही नवीन पहाट समजून पंतप्रधान मोदींच्या पाठिमागे खंबीर उभे राहावे. 2014 पासून सरकारने प्रत्येक पाऊल हे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे घेतलेले आहे. लबाड कॉंग्रेस शेतकर्‍यांच्या बाजूने कधीच नव्हती. दलालांची पाठराखण करणारा पक्ष आहे, असेही पिंपळे यांनी म्हटले.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here