कोणाचेही भविष्य आपण पाहिलेले नसते. आपण आज काय करतोय आणि उद्या काय करू हेच माहित नसल्याने जीवनातील मजा कायम आहे. अनेकजण आपल्या निरुद्योगीपणामुळे कुटुंबियांच्या पैशांची माती करतात. तर, ककाहीजण मात्र मिळालेल्या पुंजीला सत्कारणी लावून लाखाचे अब्जावधीही करतात. असे एक उद्योगी म्हणजे मिकी जगतियानी. ते लाखो मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या ‘लाईफ’चाही आधार आहेत. आज ‘कृषीरंग’च्या वाचकांसाठी आपण त्यांची कथा प्रसिद्ध करीत आहोत.
मुकेश वाधुमल जगतियानी हे नाव ऐकलेय का? नाही ना? होय, कसे ऐकणार ना..! ना ते कोणी सेलिब्रिटी आहेत, ना गुन्हेगार, ना धार्मिक पुढारी, ना गुन्हेगार, ना कोणत्याही बड्या बाप की औलाद, ना कोणाच्याही (अ)विचारांचे ठेकेदार. उलट ते गांधीवादी विचारांचे आताचे एक आघाडीची उद्योजक आहेत. श्रमाला प्रतिष्ठा असल्याचे मानणारे आणि मानवतावादी दृष्टीकोनातून आपल्या व्यवसायात कार्यमग्न असलेले मुकेश वाधुमल जगतियानी म्हणजेच मिकी जगतियानी.
त्यांनी काय दिवा लावलाय, असाही प्रश्न काही वाचकांना पडू शकतो. मित्रांनो, ते भारतातील प्रमुख दहा श्रीमंत उद्योजकांच्या यादीतील एव्हरग्रीन व्यक्ती आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रेरित असलेले मिकी सर लँडमार्क ग्रुपचे चेअरमन आहेत. दुबईतून अवघ्या जगभरात २३०० पेक्षा जास्त स्टोअर असलेले मिकी सर LIFE अर्थात लँडमार्क इंटरनॅशनल फौंडेशन फॉर इम्पोवरमेंट या संस्थेतर्फे भारतातील १ लाखांपेक्षा जास्त निराधार व अनाथ मुलांच्या राहणे, खाणे व शिक्षण याची जबाबदारी पार पाडते. तसेच चेन्नई येथे एक वृद्धाश्रमही त्यांची संस्था चालवत आहे.
‘कृषीरंग’च्या वाचक मित्र-मैत्रिणींनो, दुबईत भारताचे नाव आदराने घेतले जाते. त्यामध्ये आपल्या देशाचाही वाटा आहेच. परंतु, मिकी सरांनीही त्याला मोठा हातभार लावला आहे. मिकी हे सर्वप्रथम २०१५ मध्ये प्रकाशझोतात आले. त्यावेळी फोर्ब्सच्या १० भारतीय श्रीमंतांच्या यादीत त्यांचे नाव झळकले होते. मूळ भारतीय असलेले जगतियानी कुटुंब १९९० च्या दशकात कुवेत या अरेबिक देशात स्थिरावले होते. तिथे त्यांच्या भावासह आई-वडील राहत होते. मिकी यांचे शिक्षण मग चेन्नई, मुंबई आणि बैरुत असे जगभरातील मोठ्या ठिकाणी झाले. मग नंतर ते कॉलेज शिक्षणासाठी लंडनला (ब्रिटन) गेले.
त्यांचे वडील मधुमेह, तर आई कॅन्सरच्या आजाराने ग्रस्त होते. एक मोठा भाऊ होता. तो त्यांची देखभाल करीत असताना मिकी लंडनला गेले. तिथे त्यांनी शिक्षणासाठी कार चालवली. टॅक्सीवाला बनून सेवा देत त्यांचे शिक्षण चालू होते. मात्र, मग यापेक्षाही काहीतरी चांगले आणि खास करण्याच्या विचाराने त्यांनी शिक्षण अर्धवट सोडून वयाच्या २० व्या वर्षी पुन्हा कुवेत देशात बस्तान बसवण्याचा प्रयत्न केला. तिथे त्यांच्या भावाचे एक दुकान होते. बेबी प्रोडक्टच्या दुकानाचे काम पाहत असतानाच त्यांचा भाऊ ल्युकेमिया आजाराने त्यांना पोरका करून गेला. मग त्या दुकानाची जबाबदारी मिकी यांच्यावर आली.
आलेली जबाबदारी आणि एकाकीपण याला थेट भिडत मिकी यांनी मग व्यवसायात झोकून देऊन काम सुरू केले. १९९१ मध्ये विसाव्या वर्षी ६ हजार डॉलर आणि ते दुकान यातून त्यांच्या व्यावसायिक आयुष्याला सुरुवात झाली. त्यांनी एका दुकानाचे सह दुकाने सुरू केली. १९९२ च्या अखाती युद्धामुळे मात्र त्यांना कुवेत सोडून दुबईत यावे लागले. मग त्यांनी दुबई हीच कर्मभूमी मानून आपल्या व्यवसायाला आकार दिला. तिथेच त्यांनी लँडमार्क ग्रुपची स्थापना केली.
आता त्यांचा हा व्यवसाय मिडल इस्ट, आफ्रिका आणि भारतात विस्तारला आहे. बेबी प्रोडक्टसह फॅशन, इलेक्ट्रोनिक, फर्निचर आणि हॉटेल या क्षेत्रात हा ग्रुप जगभरात आपली छाप सोडत आहे. ‘कृषीरंग’मध्ये ही स्टोरी वाचताना तुम्हालाही मोठे होण्याचे स्वप्न पडत असेल की.. बरोबर आहे.. तेच तर माणसाचे स्वप्न असते. मात्र, हे फ़क़्त वाचू नका आपली क्षमता आणि स्वप्न यांची सांगड घालून कार्यमग्न व्हा.. यश नक्कीच तुम्हालाही मिळेल..!
लेखक : सचिन मोहन चोभे
- धक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन
- ब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक
- गाडी चालवणार्यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड
- राज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ विभागात करणार तब्बल 8 हजार 500 पदांची भरती
- खुशखबर : आता ‘या’ कंपनीच्या गाड्यांसाठी घरबसल्या मिळेल लोन; वाचा, काय आहे प्रोसेस