फडणवीस ‘ती’ गोष्ट सांगत असताना चंद्रकांत पाटील ‘तो’ मंतरलेला संदेश देत आहेत; शिवसेनेचा टोला

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात आज राज्यातील राजकारणाविषयी भाष्य केलेले आहे. यावेळी भाजपला चिमटे काढत त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीवही करून दिली आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-

राज्याच्या राजकारणात ‘वन फाइन मॉर्निंग’ अचानक काहीतरी घडेल, असे भविष्य चंद्रकांत पाटील यांनी वर्तविल्यापासून अनेकांचे घोडे स्वप्नातच उधळू लागले आहेत. फाइन मॉर्निंगला म्हणजे भल्या पहाटे काहीतरी घडेल असे चंद्रकांतदादांना का वाटते ते तपासून घ्यायला हवे. दादांची तब्येत वगैरे बरी आहे ना? त्यांना नीट झोप वगैरे लागते ना? की राजभवनातून अचानक एखाद्या फाइन मॉर्निंगला बोलावणे येईल म्हणून ते झोपतच नाहीत, असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. चंद्रकांतदादांना फाइन मॉर्निंगला काहीतरी घडेल असे वाटते. हे काही चांगल्या प्रकृतीचे ‘साइन’ नाही. देवेंद्र फडणवीस व संजय राऊत यांच्या अचानक भेटीनंतर जो गदारोळ झाला त्यामुळे एखाद्या फाइन मॉर्निंगला राजभवनावर जाऊन काहीतरी घडवता येईल असे कोणाला वाटत असेल तर ते भ्रमात आहेत.

एकतर अशा फाइन मॉर्निंगचा अचानक प्रयोग भाजपने याआधी केलाच आहे, पण त्या फाइन मॉर्निंगला जे घडले ते पुढच्या 72 तासांत दुरुस्त झाले. याचे भान सध्या फक्त श्री. देवेंद्रबाबूंनाच आहे. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राचे सरकार पाडण्याची घाई नाही व हे सरकार अंतर्विरोधानेच पडेल असे श्री. देवेंद्र फडणवीस सांगत आहेत व त्याचवेळी एखाद्या फाइन मॉर्निंगला ‘काहीतरी’ घडेल असा मंतरलेला संदेश चंद्रकांत पाटील देत आहेत. लोकांनी आता काय समजायचे? फडणवीस-राऊत भेटीत राजकारण नव्हते. ती एक सहज भेट होती याबाबत दोघांनी खुलासे केले. मुळात ती गुप्तभेट नव्हती. शिवसेनेत कोणीच ‘गुप्तेश्वर’ नसल्याने ताकाला जाऊन भांडे लपवण्याचे कारण नाही.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here