दादा, दचकू नका! महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच; शिवसेनेने सुनावले

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात आज राज्यातील राजकारणाविषयी भाष्य केलेले आहे. यावेळी भाजपला चिमटे काढत त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीवही करून दिली आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-

महाराष्ट्रासह देशात शेतकऱ्यांत अशांतता आहे. कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी देशभरात उग्र निदर्शने सुरू केली आहेत. दिल्लीत शेतकऱयांनी प्रतीकात्मक ट्रक्टर जाळून निषेध केला आहे. कोरोनाचे संकटही आहेच. अकरा दिवसांत देशांत कोरोनाचे 10 लाख नवे रुग्ण निर्माण होणे हे काही चांगले लक्षण नाही. सरकार आणि विरोधी पक्षांत या मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी व अशी चर्चा ठरवून पहाटे पहाटे झाली तरी हरकत नसावी. राज्यात प्रश्नांचे डोंगर निर्माण झाले असताना राजकारणात उगाच फुसकुल्या सोडून प्रदूषण निर्माण करणे हे प्रगल्भतेचे लक्षण नाही. पाच वर्षे राज्य फडणवीस-पाटलांनीही चालवले आहे. त्यामुळे संकटकाळात काय करायचे व काय नाही याचे भान त्यांना असायला हवे. भाजप हा प्रमुख विरोधी पक्ष आहे व आज महाराष्ट्राचे भाजप सर्वेसर्वा म्हणून श्री. फडणवीस यांच्याकडेच पाहिले जाते.

पहाटे पहाटे फडणवीसांना जाग येत नाही, पण चंद्रकांतदादांना दचकून जाग येते हे गंभीर आहे. शांत झोप लागणे हे ‘फाइन’ प्रकृतीचे लक्षण आहे. कधीच पूर्ण न होणाऱया स्वप्नांचा पाठलाग करणे हे कायम अशांत राहणाऱया मनाचे लक्षण आहे. दादा, दचकू नका! महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला व तो योग काही चांगला नव्हता. त्यामुळे नव्या घडामोडींसाठी पहाटेची कुंडली, मुहूर्त कोणी मांडू नयेत. राज्यपालांची सकाळही का बिघडवता? तुमचा खेळ होतो व राजभवन नाहक बदनाम होते. आता बदनाम होण्याचा राजभवनाचा कोटाही संपला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे सरकार पुढची साडेचार वर्षे आरामात चालेल. सरकार दिवसरात्र काम करते व पहाटे थोडी साखरझोप घेते. संकट टळले की साखरझोपेत विघ्न येत नाही. पुढील साडेचार वर्षे पहाटेचा एकही राजकीय मुहूर्त पंचांगात दिसत नाही हे आम्ही छातीठोकपणे सांगत आहोत.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here