असा ओळख शेळ्यांचा माज; गोट फार्मिंगमध्ये माज नियोजनाच्याही आहेत ‘या’ ट्रिक्स

शेळीपालन व्यवसायाचे गणित किती प्रमाणात आणि केंव्हा करडे जन्मतात व आपण त्यांना केंव्हा विकतो यावरच आहे. इथे काहीही करून जमत नाही. दुर्लक्ष तर अजिबातच नाही. कारण, एक दुर्लक्ष म्हणजे आपल्याला किमान हजारेक रुपयांचा फटका असतो. त्यामुळे यातून नफा तर मिळणारच नाही, उलट तोटा वाढू शकतो. त्यामुळेच शेळ्यांचा माज वेळेवर ओळखून त्यांना बेणूचा बोकड लावावा. तसेच आता नव्या जमान्यातील स्पंज किंवा सीआयआरजी या पद्धतीने माजाचेही नियंत्रण करावे.

सर्व शेळ्या एकाचवेळी माजावर आणण्याचे शास्त्र जगभरात लोकप्रिय होत आहे. कधीही शेळी विण्यापेक्षा आपल्याला पाहिजेत त्याच कालावधीत जर तिला करडे झाले तर खाद्य योग्य वेळी देऊन बचत व बाजारात तेजी असताना करडे विक्री करून नफा व्यवस्थापन करणेही शक्य होते. आषाढ महिना हा मांसाहारी मंडळीचा सुकाळ, तर त्याच्याच पुढचा श्रावण महिना म्हणजे शेळ्या पाळणाऱ्यांचा दुष्काळ अशी परिस्थिती भारतात सगळीकडे असते. परिणामी श्रावण महिन्यात किंवा गणपती उत्सव, नवरात्र आणि इतर काही सण व उत्सवाच्या कालावधीत कराडांचे भाव कमी होतात.

अशावेळी सर्व करडे एकाचवेळी व आषाढ किंवा सागुतीच्या कालावधीत बाजारात आणण्याचे शास्त्र आपल्याला आत्मसात करावेच लागेल. प्रजनन हंगामापूर्वी कळपात बोकड सोडल्यास जास्त शेळ्या एकाचवेळी माजावर येतात. तसेच स्पंज किंवा सीआयआरजी अवलंब यासाठी जगभरात केला जातो. (याच्या आणखी शास्त्रीय माहितीसाठी स्वतंत्र लेख पुढे येईल) प्रोस्टॉग्लॅन्डिन नावाचे संप्रेरक ११ दिवसांच्या अंतराने दोनदा देऊन १३ व्या दिवशी रेतन करण्याची एका पद्धत आहे. मात्र, यातून गर्भधारणा प्रमाण अपेक्षेइतके मिळतेच असे नाही.

शेळी माजावर आल्यावर पुढील लक्षणे दाखवते :

  • नरशी जवळीक साधण्यासह इतर शेळ्यांच्यावर अशा शेळ्या उडत राहतात.
  • शेपटी सारखी जास्त प्रमाणात हलवतात तसेच वारंवार लघवीही करतात.
  • सारख्या ओरडण्यासह बैचेन व अस्वस्थ असल्याचे दिसतात.
  • योनीचा मार्ग लाल होतो. तिथे सूजही दिसते.
  • योनीमार्गातून चिकट स्त्राव पाझरतो. अनेकदा तर असा स्त्राव रक्तमिश्रितही असू शकतो.

यातही महत्वाचा मुद्दा म्हणजे दुभत्या शेळ्यांमध्ये माज दिसण्याची तीव्रता कमी असू शकते. अशावेळी त्यांना मुका माज आल्यावर वेळीच लक्ष द्यावे. मुका माज असलेल्या शेळ्यांवर जास्त लक्ष ठेवावे आणि वेळीच त्यांची गर्भधारणा होईल याची तसदी घ्यावी.

(क्रमशः)

संपादन : सचिन मोहन चोभे

वाचक बंधू-भगिनींनो, आपण ‘कृषीरंग’वर दररोज शेळीपालन (Goat Farming) या विषयावरील माहितीची मालिका प्रसिद्ध करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीसह जगभरातील गोट फार्मिंग ट्रेंड आणि संशोधन याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. सध्या या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आल्याच्या बातम्या माध्यमांतून येतात. अशावेळी या व्यवसायाचे वास्तव आणि व्यावहारिक भान देण्याचा हा प्रयत्न आहे. आपणास कोणत्याही सूचना व मार्गदर्शन करावेसे वाटल्यास krushirang@gmail.com या इमेलद्वारे आपण आम्हाला संपर्क करू शकता. तसेच नियमित बातम्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय न्यूज अपडेट आणि कृषी-ग्रामीण विकासाची माहिती पाहण्यासाठी आमचे www.facebook.com/Krushirang (कृषीरंग) हे फेसबुक पेज लाईक व फॉलो करा. ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना माहितीसाठी शेअर करा. @टीम कृषीरंग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here