सुशांत सिंह प्रकरणात ‘त्यांनी’ काय दिवे लावले; शरद पवारांचा टोला

मुंबई :

सध्या देशाच्या राजकीय पटलावर निवडणुकांच्या अनुषंगाने प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंगच्या आत्महत्येचा मुद्दा गाजत आहे, असे म्हटले जात आहे. सर्वपक्षीय नेते त्यावर आपापली भूमिका स्पष्ट करत आहेत. अशातच जेष्ठ नेते व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सीबीआयचे नाव घेता टोला हाणला आहे. पवार यांनी म्हटले की, सुशांत सिंहची आत्महत्या राहिली बाजूला आणि इतरच गोष्टी समोर येत आहेत. एका कलाकाराने आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत होते मात्र केंद्र सरकारचा त्यांच्यावर विश्वास दिसत नाही म्हणून त्यांनी हा तपास वेगळ्या एजन्सीकडे दिला. या एजन्सीने काय दिवे लावले त्याचा प्रकाश काही आम्हाला बघायला मिळालेला नाही.

चौकशी करणाऱ्या यंत्रणा लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवू पाहात आहेत का? अशी शंका घेण्यासारखी अवस्था आहे, असेही पुढे बोलताना पवार यांनी म्हटले.

खोचक अशी टीका करत पवारांनी ‘आता भलतीकडेच सगळं चाललंय. सत्य कधी बाहेर येईल त्यावेळेला कळेल’, असेही पुढे बोलताना स्पष्ट केले.  

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here