‘ते’ पाप भाजपला महागात पडणार; कॉंग्रेसचा हल्लाबोल

मुंबई :

प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर त्या प्रकरणाला लागलेले राजकीय वळण आता एका टोकावर येऊन पोहोचले आहे. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने हल्लाबोल करत भाजपवर जहरी टीका केली आहे. कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे की, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात एम्स रुग्णालयाचा अहवाल आल्याने भाजपाचं तोंड काळं झालं आहे. तसंच सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचं राजकारण करण्याचं भाजपाचं पाप त्यांना महागात पडणार आहे.

पुढे सावंत यांनी बिहार निवडणुकीचा संबंधही या प्रकरणाशी असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी म्हटले की, भाजपचे षड्यंत्र आता उघडकीस आले आहे. बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांना व्हीआरएस उगाच मिळालेली नाही. महाराष्ट्र सरकारला बदनाम करुन ते अस्थिर करण्याचंही भाजपाचं कारस्थान उघडकीस आली आहे. जनतेच्या पैशांचा उपयोग हीन राजकारणासाठी झाला असल्याचा आरोपही सावंत यांनी केला आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुशांतच्या मृत्यूचा फायदा घ्यावा आणि मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न भाजपाने केला असल्याचेही सावंत यांनी म्हटले आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here