उदयनराजेंचे ‘ते’ सांगणे हे क्रांतिकारक : शिवसेना

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात आज मराठा आरक्षणाच्या विषयावर भाष्य केले आहे. तसेच त्या मुद्द्यासंबंधित असणाऱ्या ईतरही विषयांवर उहापोह करण्यात आलेला आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-    

मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर ढोल वाजविले ते कशासाठी? श्री. पवार हे स्वतः मराठा समाजाचेच प्रतिनिधी आहेत व फडणवीसांचे सरकार राज्यात असताना पवार मराठा मोर्चात सामील झाले होते. 10 ऑक्टोबरला सर्व संघटनांनी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. येथे मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटले असतानाच धनगर समाजही रस्त्यावर उतरला आहे. त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही, तर मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नसल्याचे धनगर समाजाच्या नेत्यांनी सांगितले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर छत्रपती उदयनराजे यांचे ”सगळ्यांचे आरक्षण रद्द करा व गुणवत्ता, आर्थिक निकष हाच निवडीचा आधार ठेवा” असे सांगणे हे क्रांतिकारक आहे. शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा गुणवत्ता आणि आर्थिक निकष हीच भूमिका मांडली.

अर्थात, बदलत्या परिस्थितीत मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण मिळायलाच हवे अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही घेतली आहे. आता सातारच्या छत्रपतींच्या संतापाचा भडका उडाला व सर्व समाजांचेच जातनिहाय आरक्षण रद्द करून गुणवत्ता, आर्थिक निकष यावरच आरक्षण ठरवा ही भूमिका त्यांनी घेतली. सातारा तसेच कोल्हापूरच्या ‘राजां’नी घेतलेल्या भूमिकांचा वेगळा अर्थ कोणी काढू नये. छत्रपती शिवरायांनी कष्ट व शौर्यातून निर्माण केलेले हे महाराष्ट्र राज्य जातीपातीच्या लढाईत फाटू नये याची काळजी सगळय़ांनीच घेतली पाहिजे. ”जातीला पोट असेल, पण पोटाला जात नसते” हे शिवसेनाप्रमुखांचे अजरामर विधान आहे. त्याचाही अर्थ यानिमित्ताने समजून घेतला पाहिजे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here