दोन्ही राजांच्या भूमिकेविषयी शिवसेनेने केले भाष्य; वाचा, काय म्हटलंय सामनात

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात आज मराठा आरक्षणाच्या विषयावर भाष्य केले आहे. तसेच त्या मुद्द्यासंबंधित असणाऱ्या ईतरही विषयांवर उहापोह करण्यात आलेला आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-    

मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर सगळ्याच समाजांचे आरक्षण रद्द करा, असे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी ठणकावले आहे. त्याच वेळी कोल्हापूरचे छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी ‘सातारकरां’पेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आड येणाऱ्यांना ठोकून काढा, असे संभाजीराजे यांनी साफ सांगितले आहे. उदयनराजे व संभाजीराजे हे छत्रपतींच्या गादींचे वारसदार आहेत व मराठा आरक्षणाच्या लढ्यात दोन्ही ‘राजे’ आघाडीवर आहेत. या दोन भूमिकांमुळे सातारा व कोल्हापूरकर घराण्यांत आरक्षणाबाबत वाद आहेत किंवा लढाईत फूट पडली आहे असे जे पसरवले जात आहे ते खरे नाही. या ज्यांच्या त्यांच्या स्वभावाच्या ठिणग्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकले नाही. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिल्याने राज्य सरकारच्या सर्व मेहनतीवर पाणी पडले. राज्यातील विरोधी पक्षांचे लोक त्याचे खापर सध्याच्या सरकारवर फोडत असतील तर ते सकल मराठा समाजाशी द्रोह करीत आहेत. ही वेळ एकमेकांवर दोषारोप करण्याची नाही, तर एकमेकांच्या मांडीस मांडी लावून, खांद्यास खांदा भिडवून मराठा तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाचा गुंता सोडवण्याची आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाने एकत्र येऊन लढा दिला पाहिजे, असे खासदार संभाजीराजे सांगत आहेत. मराठा समाज राजकीय झेंडे बाजूला ठेवून एकवटल्यानेच क्रांती झाली. पुन्हा धनगर, आदिवासी, इतर मागास वर्गाच्या तोंडचा घास काढून आपल्याला काहीच नको असे मराठा समाजाचे सांगणे आहे. सरकारने जे केले ते सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले नाही. त्यामुळे समाजात निराशा आणि वैफल्य आले आहे व त्याच उद्विग्नतेतून सातारचे छत्रपती उदयनराजे यांनी सगळ्यांचेच आरक्षण रद्द करा, गुणवत्तेनुसार मेरिटवर सर्वांची निवड करा अशी भूमिका घेतली. मराठा समाजाची आर्थिक स्थिती बरी नाही, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळूनही वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश नाही की नोकऱ्यांत प्राधान्य नाही. त्यामुळे मराठा समाजातील मुलांना नैराश्य येत असल्याचे खासदार उदयनराजे यांचे मत आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here