ठाकरे सरकारचा केंद्र सरकारशी पंगा; ‘त्या’ विषयावरून घेतली आक्रमक भूमिका

मुंबई :

सध्या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर कृषी आणि कामगार विधेयकांमुळे अस्वस्थ वातावरण आहे. ही विधेयके शेतकरीविरोधी आणि कामगारविरोधी असल्याचा आरोप विरोधीपक्ष करत आहे. दरम्यान अकाली दलाने या विधेयकांच्या पार्श्वभूमीवर आक्रमक भूमिका घेत भाजपची साथ सोडली आहे. आता या प्रकरणी महाराष्ट्र कॉंग्रेसही आक्रमक झाली आहे. महसूल मंत्री व कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळसाहेब थोरात यांनी सांगितले आहे की, या विधेयकांवर राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब केले असले तरी महाराष्ट्रात या विधेयकांची अंमलबजावणी केली जाणार नाही. महाविकास आघाडी सरकारचा या विधेयकांना ठाम विरोध आहे. या मुद्द्यावर शिवसेना आमच्यासोबत आहे आणि तिन्ही पक्ष एकत्र चर्चा करून याबाबत पुढील रणनिती ठरवणार आहोत.

दरम्यान राष्ट्रीय कॉंग्रेसच्या राज्यसभा सदस्यांना विरोध केल्यामुळे निलंबित करण्यात आले होते. भारत बंद आंदोलनातही कॉंग्रेसने सहभाग नोंदवला होता. आज महाराष्ट्र काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेत त्यांना सदर विषयासबंधित निवेदन सादर करणार आहे.    

अधिक माहिती देताना थोरात यांनी स्पष्ट केले की, केंद्र सरकारने घाईघाईने मंजूर कलेली ही विधेयके शेतकऱ्यांना संपूर्णपणे उद्ध्वस्त करणारी आहेत. शेतकऱ्यांना आता हमीभावाचे संरक्षण मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष व नाराजी आहे. बाजार समित्यांसारख्या संस्थाच केंद्र सरकारने मोडीत काढल्या आहेत. नव्या कायद्यामुळे खासगी व्यापाऱ्यांचे भले होणार आहे.  

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here