‘इथे’ पुन्हा भाजपने राष्ट्रवादीच्या मदतीने खेळली खेळी? शिवसेनेला ठेवले दुर

अहमदनगर :

राज्याच्या सत्तासमीकरणाची गणिते काहीही असली तरी अहमदनगरमध्ये सो-धा राजकारणाची समीकरणे वेगळीच आहेत. या सो-धा राजकारणाचा बळी शिवसेना ठरली असल्याची चर्चा शहरात आहे. अहमदनगरच्या मनपा सभापतीपद निवडणुकीत ऐनवेळी भाजप नगरसेवकाने राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीने त्यांचे जंगी स्वागत करत त्यांना थेट सभापतीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले. विरोधात शिवसेनेचा उमेदवार होता. अखेरीस शिवसेनेनं वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत अर्ज माघारी घेतला. राष्ट्रवादीचा उमेदवार बिनविरोध सभापतीपदी बसला. सभापतीपदाचा कार्यभार स्वीकारल्यावर अजित कोतकर यांनी ते भाजपचे आहेत की राष्ट्रवादीचे हे सांगणे टाळले.

तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात? तुम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे का? तुम्ही भाजप सोडला आहे का ? भाजपमधून सभापतीपद संख्याबळावर मिळवणे शक्य नव्हते म्हणून राष्ट्रवादीत प्रवेश केला का? असे अनेक प्रश्न विचारल्यावरही त्यांनी आपला पक्ष सांगण्याचे टाळले. नेमक्या प्रश्नांना बगल देत त्यांनी विकासाचा मुद्दा पुढे केला.

त्यामुळे शहरात आता ही भाजपची खेळी आहे का? राष्ट्रवादीची मदत घेत भाजपने आपलाच उमेदवार सभापती पदावर बसवला आहे का? नेहमीप्रमाणे शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याचे राजकारण भाजपने केले का? अशा अनेक प्रकारच्या चर्चा लोकांमध्ये चालू आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली शिवसेना राष्ट्रवादी नगरमध्ये एकमेकांच्या विरोधात आहे. शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने पाठींबा देऊन भाजपचा महापौर सत्तेत बसवला आहे.  

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here