म्हणून ‘त्या’ कार्यक्रमास होती शिवसेना-कॉंग्रेसची अनुपस्थिती; राष्ट्रवादीने दिलं ‘हे’ कारण

अहमदनगर :

राज्याच्या सत्तासमीकरणाची गणिते काहीही असली तरी स्थानिक पातळीवरील राजकारणाची समीकरणे वेगळीच असतात. अहमदनगरच्या मनपा सभापतीपद निवडणुकीत ऐनवेळी भाजप नगरसेवकाने राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीने त्यांचे जंगी स्वागत करत त्यांना थेट सभापतीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले. विरोधात शिवसेनेचा उमेदवार होता. अखेरीस शिवसेनेनं वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत अर्ज माघारी घेतला. राष्ट्रवादीचा उमेदवार बिनविरोध सभापतीपदी बसला. असे असले तरी सभापतीपदाचा पदभार स्वीकारताना शिवसेना आणि कॉंग्रेसचा एकही प्रतिनिधी तिथे नव्हता.

यावेळी ‘करोनाचा काळ सुरूय, गर्दी नको,’ असे म्हणत राष्ट्रवादीने सारवासारव केली आहे. तसेच शिवसेना या प्रकरणावरून नाराज आहे का? असे विचारताच राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारस्कर यांनी सांगीतले की, शिवसेनेत कुठल्याही प्रकारची नाराजी नाही. हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती आहेत. आता तर आमचे मिळते-जुळते होत आहे. सध्या करोना काळ सुरू आहे. करोनाच्या काळात सोशल डिस्टंसिंगचे पालन व्हावे, यासाठी जास्त गर्दी न करण्याच्या हिशोबाने कमी लोक बोलावून सभापतींनी पदभार स्वीकारला.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here