म्हणून राष्ट्रीय स्तरावरील हिंदुत्वाचे राजकारणही निस्तेज होतय : शिवसेना

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात आज एनडीए-भाजप विषयी भाष्य करण्यात आले आहे. शिवसेनेपाठोपाठ अकाली दलही एनडीएतून बाहेर पडले आहे. याच पार्श्वभूमीवर सामनाच्या अग्रलेखात भाष्य करण्यात आले आहे.  

नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-  

महाराष्ट्रात प्रखर हिंदुत्वाची जाग शिवसेनेमुळे आधीच होती व भाजपास त्यांची व्होटबँक शिवसेना काबीज करीत आहे, ही भीती वाटू लागली. त्यातूनच मतविभागणी टाळण्यासाठी आधी महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर युती झाली व पुढे काँग्रेस विरोधात ‘एनडीए’ म्हणून एक मजबूत आघाडी निर्माण झाली. या आघाडीत अनेक चढउतार आले. सत्ता आली, सत्ता गेली. अनेक घटक पक्ष सोयीनुसार सोडून गेले, पण एनडीएचे दोन खांब भाजपबरोबर राहिले ते म्हणजे शिवसेना व अकाली दल. आज या दोन्ही पक्षांनी ‘एनडीए’ला राम राम ठोकल्याने एनडीएत खरंच राम उरला आहे काय? पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दोन सार्वत्रिक निवडणुका जिंकल्या. अनेक राज्यांत त्यांची सत्ता आहे. जेथे अल्पमत होते, तेथेही या ना त्या मार्गाने सत्ता मिळविली.

केंद्रीय सत्तेचे बाहुबल हाती असले की, काहीच अशक्य नसते, पण सत्तेचे ‘गड’ जिंकले तरी एनडीएतील दोन सिंह मात्र गमावले आहेत, हे वास्तव कसे नाकारणार? आज देशाचे राजकारण एकपक्षीय राजवटीच्या दिशेने ढकलले जात आहे. तरीही अनेक राज्यांत भाजपास आघाडय़ा करूनच निवडणुकांना सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार उत्तम चालले आहे व सरकार पाच वर्षे धावत राहील, अशी स्थिती आहे.सध्या तरी अकाली दल हा ‘एनडीए’चा शेवटचा ‘खांब’ही कलथून गेला आहे. राष्ट्रीय स्तरावरील हिंदुत्वाचे राजकारणही त्यामुळे निस्तेज होताना दिसत आहे. नवा सूर्य उगवेल काय?

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here