‘त्यांचा’ हिंदुत्वाशी नक्की किती संबंध आहे; शिवसेनेचा सवाल

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात आज एनडीए-भाजप विषयी भाष्य करण्यात आले आहे. शिवसेनेपाठोपाठ अकाली दलही एनडीएतून बाहेर पडले आहे. याच पार्श्वभूमीवर सामनाच्या अग्रलेखात भाष्य करण्यात आले आहे.  

नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-  

आधी शिवसेनेला एनडीएतून बाहेर पडावे लागले. आता अकाली दल बाहेर पडले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे दोन प्रमुख स्तंभच बाहेर पडल्याने आता या आघाडीचे म्हणजेच एनडीएचे अस्तित्व खरोखर उरले आहे काय? हा प्रश्न आहेच. आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीत नक्की कोण कोण आहेत, हा संशोधनाचा विषय आहे. जे आहेत त्यांचा हिंदुत्वाशी नक्की किती संबंध आहे? पंजाब आणि महाराष्ट्र ही दोन मर्दानी बाण्याची राज्ये आहेत. अकाली दल व शिवसेना हे त्या मर्दानगीचे चेहरे आहेत. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणण्यापेक्षा भाजपप्रणीत आघाडी हाच उल्लेख करावा लागेल.

1995-96च्या दरम्यान काँग्रेस विरोधात एक मजबूत आघाडी राष्ट्रीय स्तरावर असावी, या भूमिकेतून एनडीए स्थापन झाले. तेव्हा राष्ट्रीय क्षितिजावर काँग्रेसचा सूर्य इतक्या तेजाने तळपत होता की, त्याचे चटके विखुरलेल्या विरोधकांना बसत होते. हिंदुत्व आणि नवराष्ट्रवादाचे वारे वाहत होतेच. बाबरीच्या कोसळलेल्या ढिगाऱ्य़ातून धुराचे लोट निघत होतेच. त्यामुळे देशातील राजकीय माहोल गरम होता. वेगवेगळय़ा राज्यांतील वेगवेगळे पक्ष हे काँग्रेस विरोधात, त्यांच्या धोरणांविरोधात बोलत होते. मात्र मुद्दा एक, पण ‘सूर’ शंभर यामुळे फक्त कोलाहल आणि कलकलाटच माजला होता. जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारखे प्रखर नेते काँग्रेसविरोधी धार पाजळत होते. तेव्हा आजचे नितीशबाबू ‘ज्युनियर’ होते. शिखांच्या दिल्लीतील हत्याकांडानंतर अकाली दलाचा काँग्रेसविरोधी प्रचार शिगेला पोहोचला होता. पण प्रत्येक जण आपापल्या काठीने साप समजून जमीनच धोपटत होता व त्यातूनच सत्ताधारी काँग्रेसचे फावले होते. महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची जहाल गर्जना करून देशात स्फुल्लिंग चेतवले होते.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here