मोदींच्या झंझावातात ‘ते’ नष्ट झाले; शिवसेनेचा हल्लाबोल

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात आज एनडीए-भाजप विषयी भाष्य करण्यात आले आहे. शिवसेनेपाठोपाठ अकाली दलही एनडीएतून बाहेर पडले आहे. याच पार्श्वभूमीवर सामनाच्या अग्रलेखात भाष्य करण्यात आले आहे.  

नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-  

पंजाबच्या अकाली दलानेही एनडीए म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा त्याग केला आहे. भाजपशी त्यांचीही प्रदीर्घ साथसंगत होती, पण ती आता सुटली आहे. अकाली दलाचे सर्वेसर्वा प्रकाशसिंग बादल यांच्या सूनबाईंनी शेतकऱ्य़ाच्या प्रश्नांवर केंद्रीय मंत्रिमंडळातून आधीच राजीनामा दिला. तेव्हा बरे झाले राजीनामा दिला, सुंठीवाचून खोकला गेला याच आविर्भावात अकाली दल मंत्र्यांचा राजीनामा तडक स्वीकारण्यात आला. अकाली दलाचे मन वळवले जाईल, अशी टोकाची भूमिका घेऊ नका, असे त्यांना सांगितले जाईल. पण तसे काहीच घडले नाही. आता तर बादल हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडले तरी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न होऊ नये, याचे आश्चर्य वाटते. शेतकऱ्य़ाच्या प्रश्नांवर केंद्र सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी केला आहे. केंद्र सरकारने कृषी विधेयक जोरजबरदस्तीने मंजूर करून घेतले. आम्ही सरकारचा भाग असतानाही आम्हाला विश्वासात घेतले नाही, असे सुखबीरसिंग बादल यांचे सांगणे आहे.

अखेर अकाली दलास राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडावे लागले व आणखी एक जुना, सच्चा साथीदार सोडून गेल्याबद्दल भाजपने अश्रूंची दोन टिपंही गाळली नाहीत. भविष्यात देशाच्या राजकारणात उलथापालथ घडविणारी आघाडी निर्माण होईल काय? याची चाचपणी सुरूच असते. पण राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून शिवसेनेपाठोपाठ अकाली दलही बाहेर पडल्याने राष्ट्रीय राजकारण बेचव झाले आहे. काँग्रेस हा आजही मोठा पक्ष आहे. पण राष्ट्रीय पातळीवर निवडणुका जिंकल्याशिवाय राजकीय मोठेपण सिद्ध होत नाही. ज्या कारणांसाठी ‘एनडीए’ स्थापन झाली ते कारणच मोदींच्या झंझावातात नष्ट झाले हे सत्य स्वीकारून नवा झेंडा फडकवावा लागेल.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here