म्हणून ‘त्यांनी’ हजारो डुकरांना मारण्याचे दिले आदेश; वाचा आरोग्याच्या क्षेत्रातील महत्वाची घडामोड

एखादा विषाणू किंवा रोग आल्यावर काय होऊ शकते याचा प्रत्यय आपण सगळेजण सध्या घेत आहोत.  त्यामुळेच राज्यातील नागरिकांची काळजी घेण्याच्या अनुषंगाने आफ्रिकन स्वाईन फिव्हरने(एएसएफ ) प्रभावित झालेल्या भागामधील १२ हजार डुकरांना ठार मारण्याचे आदेश दिले आहेत.

ही घटना आपल्या महाराष्ट्र राज्यातील नाही. मात्र, आपल्याच देशातील एका प्रमुख राज्यामधील आहे. त्या राज्याचे नाव आहे आसाम. मे महिन्यापासून आतापर्यंत राज्यात आफ्रिकन स्वाइन तापमुळे राज्यात १८ हजार डुकरांचा मृत्यू झाला असल्याचे सरकारने म्हटले आहे. त्यामुळे आता ऑक्टोबर महिन्यात राज्यातील उरलेल्या १२ हजार डुकरांना मारण्याचे निर्देश मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिले आहेत.

त्याचवेळी पीग फार्मर्सचे म्हणणे आहे की, सरकारची आकडेवारी चुकीची आहे. या रोगामुळे १ लाखाहून अधिक डुकरांचा मृत्यू झाला असून आजारावर कोणतीही लस नाही आणि त्याचा मृत्यू दर ९० ते १०० टक्के आहे. सरकारकडून मदत किंवा नुकसान भरपाई देण्यात आली नाही. राज्य सरकारने याप्रकरणात तातडीने लक्ष घालून मदतीची घोषणा करण्याची मागणी होत आहे.

वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अ‍ॅनिमल हेल्थ संस्थेच्या म्हणण्यानुसार हा एक व्हायरल आजार आहे. मात्र, तो फ़क़्त पाळीव आणि वन्य डुक्करांना होतो. हा आजार मनुष्यापर्यंत पसरत नाही. दूषित चारा, शूज, कपडे, वाहने, चाकू यासारख्या वस्तूंद्वारे याचा प्रसार होत असल्याचे समजते.

आसाम राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये ३३ एपिकेंटर असून २०१९ च्या पशुगणनेनुसार आसाममध्ये डुक्करांची संख्या सर्वाधिक आहे. राज्यात सुमारे २१ लाख डुक्कर आहेत. शेजारच्या राज्यांमधून आसाममध्ये होणाऱ्या डुकरांच्या आयातीवर बंदी घातली आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here