‘या’ आहेत शेळ्यांच्या उपयुक्त जाती; वाचा मार्केट ट्रेंडविषयी महत्वाची माहिती

गुगलवर जाऊन शेळीपालन, गोट फार्मिंग किंवा goat farming असे सर्च केले की भरमसाठ माहिती येते. त्यातली कोणती बरोबर, कोणती चूक आणि कोणती वास्तव कोणती अवास्तव, कोणते दावे खरे आणि कोणते दिशाभूल करणारे खोटे हाच कळीचा मुद्दा बनला आहे. त्यातही शेळीपालनात बेस्ट आणि सुंदर गोठे आणि रुबाबदार शेळ्या किंवा बोकड त्यात दिसतात. अशावेळी योग्य पद्धतीने शेळ्यांची निवड कशी करावी हाच मुद्दा अवघड होऊन बसला आहे.

तर, मित्र-मैत्रिणींनो, हा व्यवसाय चांगला आहे. त्यातून आपल्याच शेतात राहून मस्त अर्थार्जन होऊ शकते. मात्र, पैदाशीचे बोकड किंवा शेळ्या विकण्याचा धंदा जर तुम्ही करणार असाल तरच गोठ्यावर जास्त फोकस करा. त्याबाबतीत आपण पुढील भागात माहिती पाहणार आहोतच. तर, आजचा मुद्दा आहे तो शेळ्यांच्या जाती आणि मार्केट ट्रेंड हा. एकूण महाराष्ट्राचा विचार केल्यास आपल्याकडे सगळ्यात चांगली शेळीची जात मानली जाते ती उस्मानाबादी. तसेच काही भागात उस्मानाबादी सदृश्य अशा मिक्स (क्रॉस ब्रीड) शेळ्याही पाहायला मिळतात. त्याही चांगल्या आहेत. नगर, पुणे व नाशिक भागात संगमनेरी शेळ्या आहेत. तर, विदर्भात बेरारी जातीच्या तपकिरी रंगाच्या आणि काठेवाडी खानदेश भागात धुळे, शिरपूर, साक्री भागात आणि सातपुडा पर्वताच्यालगत आढळतात. मात्र, तरीही फ़क़्त स्थानिक शेळ्यांची निवड न करता आपल्याला योग्य वाटणाऱ्या आणि तज्ञांनी दिलेल्या सल्ल्याने शेळ्यांच्या जाती निवडाव्यात.

वजनाने लवकर वाढणाऱ्या, आहार व आरोग्याचा तुलनेने खर्च कमी असलेल्या, रोगाला लवकर बळी न पडणाऱ्या आणि जुळी-तिळी करडे देणाऱ्या आणि एकूणच किफायतशीर वाटणाऱ्या शेळ्या निवडाव्यात. या स्थानिक जातींसह आपल्याकडे भारतातील आणि जगभरातील इतरही पर्याय उपलब्ध आहेत. बिटाल, कच्छी, झालवाडी, सुरती, मेहसाणा, गोहिलवाडी, मारवाडी, सिरोही, जखराना, बारबरी, जमनापारी, कन्नी अडू, मलबारी, काळी बंगाली, गंजाम, आदि भारतीय जाती सध्या शेळीपालन करताना निवडल्या जातात. यातील जमुनापारी, बिटाल, जखराना, झालवाडी, सिरोही या मोठ्या आकाराच्या शेळ्या आहेत. तर, मारवाडी, कच्छी, सुरती, बारबरी, मेहसाणा, गोहीलवाडी, कन्नीअडू, मलबारी, संगमनेरी, उस्मानाबादी, गंजाम, चांगाथांगी, चेगू आणि गुड्डी या मध्यम आकाराने वाढणाऱ्या शेळ्यांच्या जाती आहेत.

परदेशी शेळ्यांच्या जातीमध्ये बोअर आणि सानेन यांचाही पर्याय आहे. मात्र, आपली आर्थिक क्षमता आणि मार्केटची मागणी याची सांगड घालून जाती निवडाव्यात. आपण ज्या भागात राहतो त्या भागातील शेळ्या आणि बोकड यांना कटाईसाठी चांगली मागणी असते. अहमदनगर भागात काळ्या रंगाच्या बोकडांना व शेळ्यांना चांगला भाव मिळतो. मग, बोअर, सिरोही अशा इतर रंगाच्या शेळ्या व बोकड कुठे विकावे अशी समस्या येते. आणि विकले तरीही त्यांना तुलनेने मग कमी नफा मिळतो. एकूणच मग हे गणित व्यवहारात बसत नाही. अशावेळी जर आपण मुंबई-पुण्यासह इतर मोठ्या शहरात बोकड विकण्यासाठी नेणार असल्यास स्थानिक शेळ्या किंवा इतर क्रॉसब्रीड पर्याय गोट फार्मिंगसाठी वापरावेत. अशा पद्धतीने विकतचा मनस्ताप घेतलेले खूप शेतकरी आम्ही पाहिलेले आहेत.

त्यामुळे आपल्या मार्केटची गरज आणि व्यवस्थापनाचे अंदाज बांधून शेळ्यांची निवड करावी. शक्यतो आपल्याकडे एक-दोन वेगळ्या जातीच्या शेळ्या किंवा बोकड आणून त्यांचे क्रॉसब्रीड करून असे नियोजन करणे परवडते. तसेच त्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. आणि शेती असो की कोणताही व्यवसाय किंवा अगदी आपले जीवन.. त्यात अनुभव हाच खरा गुरू असतो की..!

(क्रमशः)

संपादन आणि लेखन : सचिन मोहन चोभे

वाचक बंधू-भगिनींनो, आपण ‘कृषीरंग’वर दररोज शेळीपालन (Goat Farming) या विषयावरील माहितीची मालिका प्रसिद्ध करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीसह जगभरातील गोट फार्मिंग ट्रेंड आणि संशोधन याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. सध्या या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आल्याच्या बातम्या माध्यमांतून येतात. अशावेळी या व्यवसायाचे वास्तव आणि व्यावहारिक भान देण्याचा हा प्रयत्न आहे. आपणास कोणत्याही सूचना व मार्गदर्शन करावेसे वाटल्यास krushirang@gmail.com या इमेलद्वारे आपण आम्हाला संपर्क करू शकता. तसेच नियमित बातम्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय न्यूज अपडेट आणि कृषी-ग्रामीण विकासाची माहिती पाहण्यासाठी आमचे www.facebook.com/Krushirang (कृषीरंग) हे फेसबुक पेज लाईक व फॉलो करा. ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना माहितीसाठी शेअर करा. @टीम कृषीरंग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here