पोल्ट्री फार्मिगमध्ये आहे ‘हा’ स्कोप; वाचा महत्वाची माहिती आणि व्यवसायात पडा

करोना विषाणूच्या आपत्कालीन काळात पहिली अफवेची कुऱ्हाड कोसळली ती चिकनवर. चिकनमुळे कोविड १९ नावाचा हा आजार होत असल्याच्या अफवा व्हाटस्अॅप विद्यापीठात जोमाने फैलावण्यात आल्या. सध्या भारतात सर्वाधिक सॉफ्ट टार्गेट म्हणून पोल्ट्री व्यवसायाकडे सर्वांचे लक्ष जाते. याबाबतीत काहीही अफवा पिकवून हा व्यवसाय पूर्णपणे बदनाम करण्याचे डाव आखले जात आहेत. मात्र, देशाची एकूण गरज लक्षात घेता या व्यवसायाला अजिबात मरण नाही. नव्हे, यामधील स्कोप अजिबात कमी न होता दिवसेंदिवस वाढत आहे.

शाकाहार हा सर्वोत्तम आहार असेच म्हटले जाते. त्याबद्दल मतमतांतरे आहेत आणि यापुढेही राहतील. मात्र, शाकाहारी पद्धतीने शरीराला पोषणासाठी लागणारे प्रोटीन माफक प्रमाणात मिळवण्यासाठी जास्तीचा खर्च करावा लागतो. आहारात कडधान्ये व ड्रायफ्रुट्स यांचा वापर अशावेळी खूप गरजेचा असतो. एकूणच आपली रोगप्रतिकार शक्ती (इम्युनिटी पॉवर) वाढवण्यासाठी आहारात प्रीष्टमय व स्निग्न पदार्थ आणि प्रथिने यांचे योग्य प्रमाण गरजेचे असते. अशावेळी सर्वात स्वस्त प्रोटीन सोर्स म्हणून अंडी व चिकन हाच पर्याय आहे. त्यामुळेच जसजसे समाजामध्ये समतोल आहार व पोषक अन्न यावरील फोकस वाढत आहे त्याच पटीने चिकन व अंडी यांच्या मागणीत वाढ होत राहणार आहे.

सध्या भारताची परिस्थिती लक्षात घेता आपण सगळे सरासरी ५५ अंडी आणि ३.२५ किलो चिकन अख्ख्या वर्षभरात खातो. जागतिक संस्था व राष्ट्रीय पोषक आहार संस्थेच्या म्हणण्यानुसार एका व्यक्तीने किमान १८० अंडी आणि ११ किलो चिकन वर्षभरात फ़क़्त करायला हवे. म्हणजे सध्याचे मार्केट लक्षात घेता यामध्ये आणखी किमान तिप्पट वाढ आवश्यक आहे. तसेच वाढती लोकसंख्या लक्षात घेता त्याच पटीने मग आणखीही जास्त वाढ होऊ शकते. महाराष्ट्र राज्यात कुक्कुटपालन या व्यवसायासाठी चांगले वातावरण आहे. कोकण व पश्चिम महाराष्ट्रात हा व्यवसाय गावोगावी विस्तारला आहे. आता काळानुरूप मराठवाड्यात याचा विस्तार होत आहे. ज्या जमिनीत काहीही पिकात नाही अशा डोंगराळ व खडकाळ भागात आणि कमी पाण्याच्या प्रदेशात पोल्ट्री व्यवसाय हजारो शेतकऱ्यांचा जोडधंदा न राहता प्रमुख व्यवसाय बनला आहे. आता फ़क़्त शेड न करता त्याला स्वयंचलित वातानुकूलित यंत्रणा असलेले अद्ययावत पोल्ट्री शेडही उभे राहत आहेत. त्याद्वारे कमी कालावधीत व श्रमात जास्त नफा मिळण्याची नवी संधी व्यावसायिक शेतकऱ्यांसाठी खुली झालेली आहे.

(क्रमशः)

संपादन व लेखन : सचिन मोहन चोभे

वाचक बंधू-भगिनींनो, आपण ‘कृषीरंग’वर दररोज कुक्कुटपालन अर्थात पोल्ट्री फार्मिंग (Poultry Farming) या विषयावरील माहितीची मालिका प्रसिद्ध करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीसह जगभरातील पोल्ट्री फार्मिंग ट्रेंड आणि संशोधन याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. सध्या या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आल्याच्या बातम्या माध्यमांतून येतात. अशावेळी या व्यवसायाचे वास्तव आणि व्यावहारिक भान देण्याचा हा प्रयत्न आहे. आपणास कोणत्याही सूचना व मार्गदर्शन करावेसे वाटल्यास krushirang@gmail.com या इमेलद्वारे आपण आम्हाला संपर्क करू शकता. तसेच नियमित बातम्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय न्यूज अपडेट आणि कृषी-ग्रामीण विकासाची माहिती पाहण्यासाठी आमचे www.facebook.com/Krushirang (कृषीरंग) हे फेसबुक पेज लाईक व फॉलो करा. ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना माहितीसाठी शेअर करा. @टीम कृषीरंग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here