म्हणून कर्मवीर भाऊराव पाटलांच्या मुलानेही आमदारकीची ऑफर धुडकावली; वाचा किस्सा

सध्याचे राजकारण पाहता पूर्वज राजकरणात असल्याशिवाय तुम्ही राजकारणात पाऊल ठेऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. एकूणच काय तर वाड-वडिलांची पूर्वजांची पुण्याई राजकारण कामाला येतेच. कर्मवीर भाऊराव पाटलांना ३ मुले होती. शकुंतला, बेबी आणि आप्पासाहेब.

भाऊराव पाटलांचा मुलगा म्हणून कोणतीही वेगळी वागणूक आप्पासाहेबांना मिळत नव्हती. परंतु अभ्यासात हुशार असणाऱ्या आप्पासाहेबांनी आपली चुणूक दाखवून दिली आणि पुढे जाऊन त्यांना छत्रपती राजाराम महाराजांनी १० रुपये स्कॉलरशिप दिली. ही गोष्ट कळताच कर्मवीर भाऊरावांनी आप्पासाहेबांना त्यांचा कोल्हापूरमधील खर्च विचारला. ३ रुपये खर्च आहे हे कळताच उरलेले सात रुपये रयत शिक्षण संस्थेच्या निधीत जमा करण्याचे सांगितले. असे अनेक संस्कार आप्पासाहेबंवर नकळत झाले. त्याग ते लहापणापासून पाहत आले होते.

समाजकार्यासह त्यागाचाही वारसा आपल्याला आहे, हे त्यांना वेळोवेळी समजत होते. एका विमा कंपनीत काम करत असतानाही आप्पासाहेब आपल्या खरच पुरते पैसे काढून घेत आणि उरलेले सर्व पैसे रयत शिक्षण संस्थेसाठी देत होते. आप्पासाहेबांच्या प्रत्येक कृतीतून कर्मवीर अण्णांच्या संस्काराचे दर्शन व्हायचे.    

वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन चालणारे आप्पासाहेब लोकांमध्ये प्रसिद्ध होते. कर्मवीर अण्णांचा मृत्यू झाल्यावर रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद महाराष्ट्राचे शिल्पकार व द्रष्टे नेते यशवंतराव चव्हाण यांच्याकडे गेले. त्यावेळी आप्पासाहेब संघटक म्हणून संस्थेचे काम पाहू लागले. त्यावेळी आप्पासाहेबांची लोकप्रियता अफाट होती, हे लक्षात घेऊन यशवंतरावांनी त्यांना आमदारकी लढविण्याचे सुचविले तसेच मंत्री करण्याचेही आश्वासन दिले.

परंतु समाजकार्याचा आणि त्यागाचा वसा, वारसा असलेल्या आप्पासाहेबांनी त्याला स्पष्ट नकार दिला. राजकारणाची ही दलदल नाकारली. त्याकाळात ज्यांनी शिक्षणसंस्था उभारल्या त्यांनी कोट्यावधी रुपये कमावले. मग साखर कारखाने काढले. वेगवेगळे धंदे काढले. राजकारण केले,  मंत्रिपदे घेतली. ठरवलं असत तर आप्पासाहेबही हे करू शकले असते. गरज फक्त एका होकाराची होती. परंतु आप्पासाहेबांनी नकार देत आपला त्यागाचा आणि समाजकार्याचा वसा जपला.

(त्यावेळी यशवंत चव्हाणांना आप्पासाहेबांनी एका उमेदवाराचे नाव सुचविले व त्यांना उमेदवारी देण्याचे सांगितले. विशेष म्हणजे तो उमेदवार निवडूनही आला.)

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here