जयंती विशेष : अन्यायाविरुद्ध पेटून उठलेल्या ‘त्या’ खुनी माणसाचा भाऊराव पाटलांवर होता प्रभाव

प्रत्येक मोठा माणूस जेव्हा एका अत्युच्च शिखरावर असतो. त्यातल्या त्यात तो जर प्रवाहाच्या विरुध्द काम करून त्या शिखरावर पोहोचलेला असेल तर ती उंची गाठ्ण्यामागेची गोष्ट त्यांच्या बालपणात दडलेली असते. उभ्या महाराष्ट्रात कर्मवीर फक्त एकाच माणसाला संबोधले जाते ते आदरणीय कर्मवीर भाऊराव पाटील.

घरात पाटीलकी, वडील इष्ट इंडिया कंपनीत कामाला, घरी प्रचंड कर्मठ वातावरण, इतकं की ब्राम्हण जातीची शिवाशिव सुद्धा भाऊराव पाटलांच्या आईला मान्य नव्हती. अशा वातावरणात उभ्या महाराष्ट्रातल्या गरीबा-हरीबाला शिक्षण द्यायचं हे मनाशी ठरवणाऱ्या भाऊराव पाटलांच्या बालपणाचा एक किस्सा आज आम्ही आपल्यासमोर आणत आहोत.

भाऊराव यांना अन्यायाविरुद्ध प्रचंड चीड होती. त्यांच्या बालवयात आलेली ही चीड पुढे मोठी क्रांती घडवणारी होती. भाऊराव लहान होते, तेव्हा दलितांना सार्वजनिक ठिकाणी पाणी भरण्याची परवानगी नव्हती. त्यांना थोड्या पाण्यासाठी तासंतास लोकांकडे विनवणी करावी लागत असे. दोन घोट पाणी मागण्यासाठी इतरांच्या हातापाया पडावे लागत असे. तरीही पाणी मिळेल याची अजिबात खात्री नसायची. रोजच हे दृश्य पाहून भाऊरावांच्या मनात चीड निर्माण झाली. ज्या विहिरीवर लोक पाणी न्यायचे, त्या ठिकाणी पाणी शेंदण्याचा राहाठ मोडून आडात टाकला.

भाऊरावांचे गाव कुंभोज या ठिकाणी ‘सत्त्यापाचे बंड’ हे प्रकरण खूप गाजले. कुंपणाच्या काट्या तोडणाऱ्या एका दलित गरोदर बाईला एका माणसाने जनावरासारखे मारले. ती बाई गरोदर होती, एक जीव पोटात असणाऱ्या बाईला बेदम मारले. ही गोष्ट सत्त्याप्पा भोसलेला कळली. त्याला राग आला. ती बाई दलित होती म्हणून एवढी क्रूर मारहाण करणाऱ्या त्या व्यक्तीचा राग सत्त्याप्पाला आला. सत्त्याप्पा भोसलेने रागाच्या भरात त्या माणसाला ठार केले व सत्त्याप्पा भोसले फारारी झाला. तो कर्मवीर अण्णांच्या आजोबाच्या उसाच्या फडात लपून बसला. छोट्या भाऊरावाना तो अंगाखांद्यावर खेळवी. तो कर्मवीरांना पराक्रमाच्या गोष्टी सांगे. बंडखोरी,’अन्यायाविरुद्ध चीड हे सदगुण त्या खून करणाऱ्या सत्त्याप्पाकडून कर्मवीरांना मिळाले.

हेच सद्गुण आयुष्यभर कर्मवीर अण्णांनी जपले. पुढील आयुष्यात कर्मवीर अण्णांनी केलेल्या कार्यामुळे किती मोठी क्रांती घडली हे उभा देश जाणतो.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here