भाजपकडून ‘तेवढी’ एकच अपेक्षा आहे : शिवसेना

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात किसान बिलविषयी तसेच प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावतने शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटले त्याविषयी भाष्य केले आहे.

वाचा नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-

नव्या शेतकरी विधेयकाच्या दोन बाजू आहेत. सरकारने एपीएमसीमधील दलालशाही खतम केली व या मार्केटच्या बाहेरही शेतकऱ्यांला आपला माल विकता येईल, बाहेर माल विकला जाईल, तो विकत घेणारे नक्की कोण, हाच वादाचा विषय आहे. बडे उद्योगपती आता किराणा भुसार व्यवसायात गुंतवणूक करीत आहेत. म्हणजे कॉर्पोरेट कंपन्यांच्या नव्या गुलामीत शेतकरी फसणार तर नाही ना, अशी शंका आहे. शेती कंत्राटी पद्धतीने करण्याबाबतही मान्यता दिली गेली आहे; पण अमेरिका, युरोपात ही योजना फोल ठरली आहे. शेतकऱयांना भीती वाटते की, किमान समर्थनमूल्य त्यांना मिळणार नाही. सरकार म्हणते, तसे काही होणार नाही. या सर्व अफवा आहेत. या सर्व अफवाच असतील तर पंजाबच्या अकाली दलाच्या मंत्र्यांनी मोदी सरकारला शेतकरीविरोधी ठरवून राजीनामा का दिला व शेतकरी रस्त्यावर का उतरला?

आता प्रश्न असा येतो की, आंदोलन करतोय म्हणून शेतकरी हा आतंकवादी म्हणजे देशद्रोही! ज्या महिला मंत्र्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नी राजीनामा दिला त्यांच्याबाबत मात्र मौन! ही एक गंमत आहे. गरीब शेतकऱयांना कोणी बेइमान म्हणा, नाहीतर आतंकवादी. ते बिचारे काय करणार? कोणाचे काय वाकडे करणार? अन्याय असह्य झालाच तर पोराबाळांसह आत्महत्येचा मार्ग स्वीकारतील. वर्षानुवर्षे हेच तर सुरू आहे. शेतकरीराजा दहशतवादी, मुंबई पाकिस्तान, महापालिका बाबराची फौज वगैरे वगैरे. बाकी सर्व सोडा हो! पण सत्ताधारी भाजप मंडळाने शेतकऱ्यांचा अवमान झाल्यावर तरी तोंडावरचे मास्क काढावे हीच एक अपेक्षा आहे. महाराष्ट्रातील मराठी मुलीबाबत घाणेरड्या शब्दांत विधान केल्यावरही राष्ट्रीय महिला आयोगास जाग येऊ नये याचेच आश्चर्य वाटते. 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here