‘बाबर सेनेचा जुलूम’, ‘मोदीभक्त नटी’ म्हणत शिवसेनेचा हल्लाबोल; वाचा काय म्हटलेय सामनात

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात किसान बिलविषयी तसेच प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावतने शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटले त्याविषयी भाष्य केले आहे.

वाचा नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-

आपल्या हक्कांसाठी लढणारे शेतकरी ‘आतंकवादी’ किंवा ‘दहशतवादी’ आहेत असा कांगावा कोणी करीत असेल तर ती बेइमानीच आहे. पण एका नटीच्या बोलण्यावर नागोबासारखे डुलणारे राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या अवमानावर गप्प बसले आहेत. मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक विधेयक संसदेत आणले. हे विधेयक क्रांतिकारक, ऐतिहासिक, इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांना दुसरे स्वातंत्र्य मिळवून देणारे असल्याचे मत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले. ते बरोबर असेलही. पाशवी बहुमत, जोरजबरदस्तीच्या दंडेलीवर हे विधेयक मंजूर करून घेतले. पण पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेशात या विधेयकाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरला आहे.

ठिकठिकाणी त्यांनी चक्काजाम केला आहे. हे सर्व संयमाने आणि शांततेने सुरू असताना शेतकऱ्यांना दहशतवादी संबोधणे हे कसले लक्षण मानावे? शेतकऱ्यांवर लाठीमार केला, गुन्हे दाखल केले हा तर अतिरेकच म्हणावा लागेल. ‘बाबर’ सेनेनेसुद्धा इतका जुलूम केला नसता; पण हा देश सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांना भाजपसमर्थक मोदीभक्त ‘नटी’ने आतंकवादी ठरविले. आंदोलन करणारे शेतकरी अतिरेकी असतील तर त्या समस्त अतिरेक्यांसाठी सरकारने नवे कृषिविधेयक मंजूर केले असे मानायचे काय? पंतप्रधान मोदी हे शेतकऱ्यांचे शत्रू आहेत असे आम्हाला कधीच म्हणायचे नाही.   

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here