‘हा’ तर आंबेडकरांचा अपमान; संजय राऊतांचा सामनातून ‘त्या’ पक्षावर हल्लाबोल

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून आज रोखठोक सदरअंतर्गत उत्तर प्रदेशात आग्रा येथे उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे म्युझियम विषयी भाष्य केले आहे. तसेच इतर विषयावरही उहापोह केला आहे.

राऊत यांनी रोखठोकमध्ये म्हटले आहे की, उत्तर प्रदेशच्या राजकारणात मायावती यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाणे खणखणीत पद्धतीने वाजवले. आंबेडकर महाराष्ट्राचे. शाहू, फुले, आंबेडकर यांचे स्मरण केल्याशिवाय महाराष्ट्रात राजकीय सूर्य उजाडत नाही, पण महाराष्ट्रात आंबेडकरवादी पक्षांनी स्वतःचे इतके अधःपतन आणि हसू करून घेतले की, ‘निवडणुकीत मते कापणारी मंडळी’ हीच त्यांची ओळख झाली आहे, असे आता जनतेचे मत बनले आहे. बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांना महाराष्ट्रात काही ठिकाणी रिपाइं उमेदवारांपेक्षा जास्त मते पडतात. याउलट ‘आंबेडकरां’च्या विचारांचा वारसा सांगणारा, दीनदुबळय़ा दलितांना न्याय देणारा ‘आंबेडकरी पक्ष’ म्हणून मायावतींचा बहुजन समाज पक्ष उत्तर प्रदेशात सत्तेवर आला व राष्ट्रीय राजकारणातही स्थिरावला.

आंबेडकर हे महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेशच्या राजकारणात जाऊन स्थिरावले त्यास कारणे आहेत. इथला आंबेडकरी पक्ष महाराष्ट्राला शिव्या देणाऱ्य़ा ‘कंगना’ नावाच्या नटीच्या ‘झिंदाबाद’च्या घोषणा द्यायला विमानतळावर पोहोचला. ज्या आंबेडकरांनी ”मुंबई महाराष्ट्राचीच” असे ठणकावून सांगितले, त्या मुंबईस ‘पाकिस्तान’ म्हणणाऱ्य़ा नटीच्या स्वागतास ‘आंबेडकरी’ विचारांचा एक पक्ष पोहोचतो हा आंबेडकरांचा अपमान आहे. असे वैचारिक द्रोह कांशीराम यांनी केले नाहीत व मायावती यांनाही ते करता आले नाहीत. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात डॉ. आंबेडकर त्यांना देवाप्रमाणे पावले. आता महाराष्ट्राचे दुसरे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने आग्रा येथे भव्य म्युझियम, तेसुद्धा ‘मुघल’ नावावर फुली मारून निर्माण होत आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज मनामनात आणि रगारगात आहेत. मराठा आंदोलनाचे नेतृत्व स्वतः छत्रपती संभाजीराजे करीत आहेत. तरीही ‘अस्मिते’च्या प्रश्नावर छत्रपती शिवाजीराजांच्या नावाने सारा महाराष्ट्र आधी एकवटतो व मग राजकीय स्वार्थासाठी फुटतो हे दुर्दैव आहे!

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here