विरोधक करतात शेतकऱ्यांची दिशाभूल; पंतप्रधान मोदी यांनी केला दावा

केंद्र सरकारने आणलेले तिन्ही विधेयक हे शेतकरी हिताचे आणि कृषी क्षेत्राला गतिमान करणारे असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. बिहारमधील एका निवडणूक प्रचारसभेला व्हिडिओद्वारे संबोधित करताना त्यांनी यावरील सरकारची बाजू मांडली.

 

सरकारने अनेलेली तीन विधेयके ऐतिहासिक स्वरूपाची आहेत. या विषयावरून विरोधी पक्षाचे लोक शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे. या तरतुदींतून शेतकऱ्यांना नवीन स्वातंत्र्य देण्यात आले आहे. आता शेतकरी माल कोठेही नेऊन विकतील. नजीकच्या त्याच मार्केट कमिटीत आपले उत्पादन विकण्याची त्यांच्यावर आता सक्ती नाही. आता दलालांच्या कचाट्यातून शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने सुटका होणार आहे. शेतकऱ्यांना याची चांगली जाणीव असून दलालांच्या समर्थनार्थ कोण उभे आहे हेही शेतकऱ्यांना कळून चुकले आहे.

 

 

अकाली दलाच्या कॅबिनेट मंत्री हरसिम्रत कौर यांनी ही विधेयके शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करून मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे. तसेच विविध राज्यांमध्ये शेतकरी या विधेयकांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधानांनी केलेल्या या दाव्याला महत्त्व आहे.

 

कॉंग्रेसने सुद्धा त्यांच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना त्यांचा माल मुक्‍तपणे विकण्याची अनुमती देण्याचे आश्‍वासन दिले होते. पण आता हेच लोक शेतीविषयक विधेयकांवरून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत. या विधेयकांद्वारे शेतकऱ्यांचे सुरक्षा कवच अधिक मजबूत करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी हमीभाव जाहीर करण्याची सध्या सुरू असलेली पद्धत कायम राहील. ही पद्धत रद्द केली जात असल्याचा खोटा आरोप विरोधकांकडून लावला जात आहे असेही त्यांनी सांगितले.

 

संपादन : सचिन पाटील

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here