मुरघास ही आहे पशुपालनाची गरज; वाचा महत्वाची माहिती

दुग्धव्यवसायात जनावरांच्या आहारावर साधारणत: ७०% खर्च होतो, त्यामुळे दुग्धव्यवसाय किफायतशीर करण्यासाठी कमी खर्चात वर्षभर लागणाऱ्या सकस वैरणीचे नियोजन करणे आवश्यक असते. वर्षभर सकस चारा उपलब्ध असेल व तो संतुलित प्रमाणात दिला तर दुभत्या जनावरांचे पोषण व्यवस्थित होऊन त्यांच्यापासून पूर्ण क्षमतेने चांगल्या प्रतीचे दूध मिळू शकते.

 

बऱ्याच भागामध्ये पाण्याच्या उपलब्धतेवर  हिरव्या चाऱ्याची उपलब्धता अवलंबून असते. काही ठिकाणी उन्हाळ्यात पाण्याअभावी हिरवी वैरण उपलब्ध नसते त्यामुळे जनावरांचे कुपोषण होते व त्याचा अनिष्ट परिणाम  जनावराचे आरोग्य, पैदास व दूध उत्पादनावर होतो. हिरव्या चाऱ्यावर होणारा खर्च विचारात घेता दूध उत्पादकाने हिरवा चारा स्वत: उत्पादित करणे फायदेशीर ठरते.  उपलब्ध हिरव्या चाऱ्याचा मुरघास तयार करून त्याचा वापर केल्यास टंचाईच्या काळात व वर्षभर सकस चारा उपलब्ध होऊन दुग्धव्यवसाय किफायतशीर करता येतो.

 

हिरवी वैरण फुलोऱ्यात असताना तिच्यात जास्तीत जास्त पौष्टिक घटक असतात या अवस्थेती वैरण कापून, कुट्टी करून, दाबून हवाबंद स्थितीत ठेवल्यास ४५ दिवसात तिचा उत्कृष्ट मुरघास तयार करता येतो. सर्वसाधारणपणे ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. या काळात मुरघास तयार केल्यास तो जानेवारी पासून उपलब्ध होतो. एकदल चारा पिकं उदा. मका, शुगरग्रेझ, ज्वारी, बाजरी,  न्युट्रीफीड, संकरीत नेपियर यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असल्यामुळे यापासून चांगल्या प्रतीचा मुरघास तयार होतो.

प्लॅस्टिक बॅग, बंकर किंवा जमिनीत खड्डा घेऊन त्यात मुरघास तयार करता येतो. एक घनफूट जागेत १५ किलो मुरघास तयार करता येतो. हल्ली मुरघास तयार करण्यासाठी आधुनिक यंत्र उपलब्ध झालेले आहेत. त्यांच्या सहाय्याने प्लॅस्टिकमध्ये वेगवेगळ्या क्षमतेत ( ५०,१००,५००,१०००  किलो ) मुरघास तयार करता येतो.

 

मुरघास बनविण्याची पद्धत :-

ओली वैरण फुलोऱ्यात असताना तिची कापणी करावी. आवश्यकतेनुसार सुकवावी व कुट्टी करावी. मुरघास करताना कुट्टीतील पाण्याचे प्रमाण ६५% – ७०% असावे. कुट्टीचा आकार २-३ सेंमी असावा. खड्यात मुरघास तयार करतांना त्यामध्ये प्लॅस्टिक कागद सर्व बाजूनी व्यवस्थित अंथरावा, त्यामध्ये चारा पिकाच्या कुट्टीचा अर्धा ते एक फुट जाडीचा थर पसरावा व व्यवस्थित दाबावा. अशाप्रकारे कुट्टीचे थरावर थर देऊन दाबावे  जेणेकरून जास्तीत जास्त हवा निघून जाईल. हवा शिल्लक राहील्यास त्यात बुरशीची वाढ होते. मुरघास बनवीत असतांना त्यामध्ये काही उपायकारक जीवाणूंची गरज असते. अशा प्रकारचे जैविक संवर्धक ठराविक दुकानात विक्रीस उपलब्ध असतात. ते जर कुट्टीत मिसळले तर मुरघास लवकर व उत्तम दर्जाचा तयार होतो. आवश्यकतेनुसार प्रती टन २ किलो गुळ, यूरिया आणी ताक ३०० ग्राम, मिनरल पावडर ५०० ग्राम, मीठ ४०० ग्राम ५ ते ७ लिटर्स पाण्यात मिसळून कुट्टीच्या थरावर शिंपडल्यास मुरघासाची प्रत सुधारण्यास मदत होते.

खड्डा व्यवस्थित भरल्यानंतर  प्लॅस्टिक कागदाने व्यवस्थित झाकून त्यावर पालापाचोळा / ऊसाचे पाचट किंवा वाळलेल्या गवतांचा थर द्यावा व त्यावर ४-५ इंचाचा मातीचा थर द्यावा. मुरघास तयार होताना त्यातील विशिष्ट जिवाणूमुळे लॅक्टिक आम्ल तयार होते. त्यापासून जनावरास उर्जा मिळते तसेच मुरघासाला आंबुस वास येतो.

उत्तम प्रतीचा मुरघास सोनेरी पिवळसर रंगाचा असतो. जनावर तो आवडीने खातात व तो सहज पचतो.

 

मुरघासाचे फायदे :-

१. पावसाळ्यामध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक उत्पादित झालेला हिरवा चारा मुरघास करून टिकवून ठेवता येतो व

उन्हाळ्यात खाऊ घालता येतो.

२. हिरव्या चाऱ्याची पौष्टिकता टिकून राहते.

३. वर्षभर सकस चारा उपलब्ध होतो.

४. वर्षभरासाठी लागणाऱ्या वैरणीचे नियोजन करता येते.

४. खुराकावरील खर्च कमी करता येतो.

५. मक्याची ७० दिवसात एकाच वेळी कापणी झाल्यामुळे दुसऱ्या पिकांसाठी लवकर जमीन उपलब्ध होते.

६. साठवणुकीस कमी जागा लागते.

७. रोज चारा कापणी, वाहतुक, कुट्टी करणे यासाठी लागणारा वेळ वाचतो.

८. मुरघास पचनास सुलभ असतो व जनावरे तो आवडीने खातात.

९. दुधातील फॅट व एसएनएफ यामध्ये वाढ होते.

१०. गायीपासून पूर्ण क्षमतेने व अधिक काळ दूध उत्पादन मिळत राहून दूध उत्पादन वाढते.

११. जनावराचे आरोग्य सुधारते.

१२. वेळेची बचत व उत्पादन खर्च कमी होतो.

१३.  सर्व हवामानात दीर्घकाळ साठवणुक करता येते.

१४. प्रति लिटर दूध उत्पादन खर्च कमी होतो.

१५ .दुधाची गुणवत्ता टिकून राहून गायींचे आरोग्य चांगले सुधारते.

 

मुरघास खाऊ घालण्याची पद्धत:-

४५ दिवसांनी तयार झालेला मुरघास देण्यासाठी खड्डयावरील प्लॅस्टिक एका बाजूने आवश्यकतेनुसार उघडावे. पाहीजे तेवढा मुरघास रोज काढून घ्यावा व उरलेला मुरघास पुन्हा प्लॅस्टिकच्या कागदाने झाकून हवाबंद करावा. सर्वसाधारणपणे एका गायीस दर दिवशी २० किलो मुरघास द्यावा. तो खाऊ घालण्याचे प्रमाण हे त्या गायीची दूध देण्याची क्षमता व इतर चाऱ्याची उपलब्धता यावर अवलंबून असते. मुरघासात हवा राहील्यास त्यावर बुरशी वाढते व बुरशीयुक्त मुरघास हा जनावरांस अपायकारक ठरू शकतो.

 

लेखक :

डॉ. धीरज सवाई (9975363097 )

डॉ. गजानन जाधव (7588689747)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here