आरोग्यसेवा देणाऱ्या ‘त्या’ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात झाली एवढी वाढ; आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई :

शहरात आणि निमशहरी भागात मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. तुलनेत खेड्यात आणि आदिवासी भागात मात्र सुविधांची वानवा आहे. अशा कठीण परिस्थितीतही अनेक आरोग्यसेवक आदिवासी भागात काम करतात. आदिवासी भागात सेवा देणाऱ्या मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात भरीव वाढ करीत ते मानधन २४ हजारांवरून ४० हजारांवर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, काल मंत्रालयात मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पाडली. यावेळी आदिवासी भागात सेवा देणाऱ्या मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात भरीव वाढ करीत ते मानधन २४ हजारांवरून ४० हजारांवर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. राज्यातील १६ आदिवासी जिल्ह्यातील आदिवासी भागात ‘नवसंजीवनी’ योजनेंतर्गत मानसेवी वैद्यकीय अधिकारी कार्यक्षेत्रात जाऊन सेवा देतात. तसंच आश्रम शाळेत तपासणीचे काम करतात. हे मानसेवी वैद्यकीय अधिकारी अतिदुर्गम आणि संवेदनशील भागातील साधारण गावांना सेवा देतात.

अधिक माहिती सांगताना टोपे यांनी स्पष्ट केले की, बाह्य रुग्ण तपासणी, गरोदर माता, स्तनदा माता व कुपोषित बालकांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करतात. त्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राना इतर राष्ट्रीय कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणीसाठी मदत करतात. मानसेवी आरोग्य अधिकारी हे पद कंत्राटी स्वरूपाचे असल्याने त्यांना इतर लाभ मिळत नाहीत. या निर्णयाचा लाभ राज्यातील दुर्गम, संवेदनशील भागात आरोग्य सेवा देणाऱ्या मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांना होणार आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here