स्वतः शेण खायचे व दुसऱयांचे तोंड हुंगायचे; शिवसेनेची ‘त्यांच्यावर’ जहरी टीका

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून आज सिनेसृष्टीबाबत चालू असलेल्या वादावर भाष्य करण्यात आले आहे.

वाचा नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात :-

मनोरंजन उद्योग रोज पाच लाख लोकांना सरळसोट रोजगार देतो. सध्या अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. ‘लाइट, कॅमेरा, ऍक्शन’ बंद असताना लोकांचे लक्ष मूळ प्रश्नांपासून हटवण्यासाठी आम्हाला (म्हणजे बॉलीवूडला) सोशल मीडियावर बदनाम केले जात आहे, असे जया बच्चन यांनी सांगितले आहे. काही नट-नट्या म्हणजे संपूर्ण बॉलीवूड नव्हे, पण त्यातलेच काहीजण ज्या बेतालपणे वक्तव्ये करीत आहेत तो सर्वच प्रकार घृणास्पद आहे. सिनेसृष्टीतील यच्चयावत सगळे कलाकार किंवा तंत्रज्ञ हे जणू ‘ड्रग्ज’च्या जाळय़ात अडकले आहेत, चोवीस तास गांजा, चिलमीचे झुरके मारीत दिवस ढकलत आहेत, असे सरसकट विधान करणाऱयांची ‘डोपिंग’ टेस्ट व्हायला हवी. कारण यापैकी बहुतेकांच्या बाबतीत खायचे दात व दाखवायचे दात वेगळे आहेत. हिंदुस्थानी सिनेसृष्टीस एक परंपरा आणि इतिहास आहे. ही मायानगरी असेलही, पण या मायानगरीत जसे ‘मायावी’ लोक आले आणि गेले तसे अनेक संतसज्जनही होतेच. ज्या दादासाहेब फाळके यांनी हिंदुस्थानी सिनेसृष्टीचा पाया रचला ते महाराष्ट्राचेच होते. दादासाहेब फाळके यांनी मोठय़ा कष्टातून या साम्राज्याचे तोरण बांधले. राजा हरिश्चंद्र, मंदाकिनीसारख्या ‘मूकपटा’ने झालेली हिंदी सिनेसृष्टीची सुरुवात आजच्या शिखरापर्यंत पोहोचली ती अनेकांच्या कष्टांमुळेच. जो आपली हुनर व कला दाखवेल तोच येथे टिकेल. एक जमाना सैगल, देविका राणीचा होता. आजही अमिताभ बच्चन हे महानायकपदी अढळ आहेत.

कधी त्या जागी राजेश खन्ना होते. धर्मेंद्र, जितेंद्र, देव आनंद, संपूर्ण कपूर खानदान, मा. भगवान, वैजयंती मालापासून हेमामालिनीपर्यंत आणि माधुरी दीक्षितपासून ऐश्वर्या रायपर्यंत एकापेक्षा एक सरस कलाकारांचे योगदान आहेच. पडद्याचे बॉक्स ऑफिस खुळखुळत ठेवायला आमिर, शाहरुख, सलमान अशा ‘खान’ मंडळींची मदत झालीच आहे. हे सर्व लोक फक्त गटारातच लोळत होते व ड्रग्ज घेत होते असा दावा कोणी करत असेल तर बकवास करणाऱयांच्या तोंडाचा वास आधी घ्यायला हवा. स्वतः शेण खायचे व दुसऱयांचे तोंड हुंगायचे असाच प्रकार सध्या सुरू आहे. त्या विकृतीवरच जया बच्चन यांनी हल्ला केला आहे. आमचे सिने कलाकार सामाजिक दायित्वही पार पाडीत असतात. युद्धकाळात सुनील दत्त व त्यांचे सहकारी सीमेवर जाऊन सैनिकांचे मनोरंजन करीत असत. मनोज कुमारने सदैव ‘राष्ट्रीय’ भावनेनेच चित्रपट निर्मिती केली. अनेक कलाकार संकटसमयी खिशात हात घालून मदत करीत असतात.

राज कपूरच्या प्रत्येक चित्रपटात सामाजिक दृष्टिकोन, समाजवाद याची ठिणगी दिसत होतीच. आमिर खानचे चित्रपटही आज त्याच चौकटीचे आहेत. हे सर्व लोक नशेत धूत होऊन हे राष्ट्रीय कार्य करीत आहेत. अशा गुळण्या टाकणे हा देशाचाच अवमान आहे. अनेक कलाकारांनी आणीबाणीतील मनमानीविरुद्ध आवाज उठवला व त्याची जबर किंमत त्यांना मोजावी लागली. आजही सिनेसृष्टीत तीच एक खदखद स्पष्ट दिसत आहे. आज अनेक कलाकार हे सत्ता पक्षाचे नामदार, खासदार वगैरे झालेले दिसतात. त्यामुळे त्यांची मजबुरी समजून घ्यावीच लागेल. सत्ता आणि सत्य यामध्ये एक दरी असतेच. सिनेसृष्टीशी इमान राखायचे तर सत्ताधाऱयांकडून टपली मारली जाईल. त्यामुळे सूर्य हा पश्चिमेलाच उगवतो असा प्रचार करणे हाच त्यांचा धर्म ठरतो. सिनेसृष्टीचे ‘गटार’ झाले असे बोलणाऱ्यांनी लाज सोडली. पण त्यांच्या मागे सत्ताधाऱ्यांच्या ‘झांजा’ असल्याने या मंडळींनाही चिपळ्या वाजवाव्या लागतात. मग सिनेसृष्टीशी ती बेइमानी ठरली तरी चालेल. हिंदी सिनेसृष्टीने जागतिक स्तरावर नावलौकिक निर्माण केला आहे. हॉलीवूडच्या बरोबरीने तुमच्या बॉलीवूडचे नाव घेतले जाते. पण उद्योगात जसे टाटा, बिर्ला, नारायण मूर्ती, अझिम प्रेमजी आहेत, तसे नीरव मोदी, मल्ल्या आहेत. सिनेसृष्टीच्या बाबतीतही तसेच म्हणावे लागेल. सब घोडे बारा टके असे सरसकट म्हणणे हा सच्च्या कलाकारांचा अपमान ठरतो. जया बच्चन यांनी तोच आवाज उठवून सिनेसृष्टीला जाग आणली. त्यातून किती कलावंतांना कंठ फुटतो ते पाहू.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here