‘ते’ आता तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प बसलेत; शिवसेनेचा हल्लाबोल

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून आज सिनेसृष्टीबाबत चालू असलेल्या वादावर भाष्य करण्यात आले आहे.

वाचा नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात :-

हिंदुस्थानची सिनेसृष्टी पवित्र गंगेप्रमाणे निर्मळ आहे असा दावा कोणीच करणार नाही, पण काही टिनपाट कलाकारांनी दावा केल्याप्रमाणे सिनेसृष्टीस ‘गटार’ही म्हणता येणार नाही. श्रीमती जया बच्चन यांनी संसदेत नेमकी हीच वेदना बोलून दाखवली आहे. ”ज्या लोकांनी सिनेसृष्टीत नाव, पैसा सर्वकाही कमावले ते आता या क्षेत्रास गटाराची उपमा देत आहेत. मी त्याच्याशी सहमत नाही.” श्रीमती जया बच्चन यांनी मांडलेली भूमिका जितकी महत्त्वाची तितकीच परखड आहे. हे लोक ज्या ताटात जेवतात त्याचीच बेइमानी करतात.

अशा खाल्ल्या मिठास न जागणाऱया लोकांवर जया बच्चन यांनी हल्ला केला आहे. श्रीमती बच्चन या सत्य आणि परखड बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपली राजकीय, सामाजिक मते कधीच लपवून ठेवलेली नाहीत. महिलांवरील अत्याचारांबाबत त्यांनी संसदेत अत्यंत भावुक होऊन आवाज उठवला आहे. सिनेसृष्टीची यथेच्छ बदनामी आणि धुलाई सुरू असताना एरवी तांडव करणारे भलेभले पांडव तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प बसले आहेत. जणू ते अज्ञात दहशतीखाली जगत आहेत किंवा कोणीतरी त्यांचे वागणे, बोलणे पडद्यामागून नियंत्रित करीत आहे. पडद्यावर शूर, लढवय्यांच्या भूमिका करून वाहवा मिळविणारे अचाट-अफाट कलावंतही मनाने आणि विचाराने कुलूपबंद होऊन पडले आहेत. अशा वेळी श्रीमती बच्चन यांची बिजली कडाडली आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here