कांद्याच्या विषयावरून शरद पवार आणि केंद्रीय मंत्र्यांची बैठक; पवारांनी मांडले ‘हे’ मुद्दे, आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार ‘हा’ परिणाम

मुंबई :

केंद्र सरकारने कांदा उत्पादनावर निर्यात बंदी घातल्याचे पडसाद अवघ्या देशभरात उमटले आहेत. केंद्राच्या या निर्णयाचे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक परिणाम होणार असल्याचे तज्ञ सांगत आहेत. अशातच जेष्ठ नेते व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री श्री. पियुष गोयल यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांची परिस्थिती विशद केली.

या बैठकीत पवारांनी मांडलेले मुद्दे :-

  • कांदा उत्पादक हा जिरायत शेतकरी आहे. त्याचप्रमाणे हा बहुसंख्य शेतकरी अल्पभूधारक आहे. तसेच जो कांदा आपण निर्यात करतो त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप चांगली मागणी असते. आजपर्यंत आपण सातत्याने कांदा निर्यात करत आलो आहोत. पण केंद्र सरकारच्या अशा आकस्मिक निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचा एक खात्रीशीर निर्यातदार देश म्हणून भारताची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला मोठा धक्का बसतो. आणि या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात भारत हा निर्यातीच्या बाबतीत एक बेभरवशाचा देश आहे अशी प्रतिमा बनण्याची शक्यता बळावते. ती आपल्याला परवडणारी नाही. या परिस्थितीचा अनाठायी फायदा पाकिस्तान आणि इतर जे कांदा निर्यातदार देश आहेत त्यांना मिळतो.
  • या सगळ्या गोष्टींचा विचार करून कांदानिर्यातबंदीबाबत फेरविचार करावा अशी विनंती सन्माननीय केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना केली.
  • या विनंतीला अनुसरून पियुष गोयल यांनी सांगितलं की, हा कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाकडून आला असून बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमतींच्या आधारावर लोकांना कांदा महाग मिळू नये यादृष्टीने सरकारने हा निर्णय घेतला आहे.

या संदर्भात वाणिज्य मंत्रालय, अर्थ मंत्रालय आणि ग्राहक संरक्षण मंत्रालय या तिन्ही मंत्रालयांशी बोलून आम्ही पुन्हा एकदा या गोष्टीचा फेरविचार करू व जर एकमत झाल्यास याबाबतीत पुनर्निर्णय घेऊन असं केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांनी स्पष्ट केलं.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here