ठाकरे ब्रँड? हे काय नवीन काढलं; ‘या’ भाजप नेत्याने उडविली खिल्ली

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात ‘महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ‘ठाकरे’ ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल,’ असे रोकठोकमध्ये शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी खोचक टीका केली आहे.

त्यांनी म्हटले आहे की,  ठाकरे ब्रँड? हे काय नवीन काढलं? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे. महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचाच ब्रँड आहे. त्यांच्याशिवाय दुसरा कोणताच ब्रँड नाही.

नेमकं काय म्हटलं होतं सामनात :-

‘राज ठाकरे हे सुद्धा महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या ठाकरे ‘ब्रॅण्ड’चे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ‘ठाकरे’ ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल. कुणीही उठावे आणि मुंबई-महाराष्ट्रावर चिखलफेक करावी हे आता तरी थांबले पाहिजे. दिल्ली किंवा महाराष्ट्रात कोणाचेही सरकार असो, एखादी अज्ञात शक्ती आमच्या मुंबईच्या विरोधात पद्धतशीरपणे कारस्थाने करत असते. महाराष्ट्राच्या रक्तातील मराठी पेशी मारण्याचे कारस्थान सुरू आहे. सूर्य, चंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही हे शब्द उच्चारताच वणव्याप्रमाणे पेटून उठणारा मराठी माणूस कायमचा लाचार करण्याचे षड्यंत्र नव्या राजकारणात रचले गेले आहे. मुंबईचे महत्त्व, मुंबईचे वैभव कमी केले की महाराष्ट्राचे आपोआप पतन होईल, असे ज्यांच्या मनात आहे ते मराठी माणसाला कमी लेखत आहेत.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here