पुण्यतिथी विशेष : वाचा “रुस्तम – ए – हिंद” पैलवान हरिश्चंद्र बिराजदार यांची गोष्ट

वारकऱ्यांचे पाऊले जशी आपसूक ओढीने पंढरीच्या दिशेने ओढीने निघतात. त्याच ओढीने पैलवणांची पाऊले कोल्हापूरच्या लाल मातीच्या दिशेने ओढीने निघतात. कुस्तीच्या नकाशाची जर निर्मिती केली तर कोल्हापूर हे कुस्तीची कर्मभूमी असेल. हजारो, लाखो पैलवान याच तांबड्या मातीत पैलवान झाले. त्यांनी नाव केलं, त्यांच्या शड्डूचा आवाज महाराष्ट्र, भारत आणि जगाच्या कोपऱ्यात घुमला. त्यांनी कर्तृत्व केलं, यश मिळवलं, आणि महाराष्ट्राचे नाव केलं !


असाच एक आई नसलेला मुलगा. मात्र वडील पंचक्रोशी मधील पट्टीचे पैलवान, उभा राहिले कुस्ती खेळायला तर हात द्यायला चळ चळ पैलवान कापायचे अशा पैलवणाचे हे पोरगं. वयाच्या पंधराव्या वर्षी कोल्हापूर च्या गांगावेस तालमी मध्ये डोक्यावर पेटी, खुराल, आणि पैलवान होण्याची उरात जिद्द घेऊन गेलं. उंच पुरे असणारा हा तरुण पुढे काय इतिहास करणार आहे कुस्तीच्या इतिहासात कोणाला कल्पना पण आली नसेल. 
कोण होता हा तरुण काय नाव होते या तरुणाचे तर “हरिश्चंद्र बिराजदार” असे या तरुणाचे नाव होते. अफाट ताकद, मेहनत घेण्याची क्षमता, तितकीच चपळाई आणि बुद्धिमत्ता याच्या जोरावर या तरुणाने वयाच्या १९ व्या वर्षी वयाने, ताकदीने वरचढ असणाऱ्या दादा चौघुले या मल्लाला अस्मान दाखवले. याच कुस्तीचा इतिहास लिहिला गेला आणि १९ व्या वर्षी हरिश्चंद्र बिराजदार नवाचा तरुण “महाराष्ट्र केसरी” झाला. इतक्यावरच थांबून कसे जमेल त्याच वर्षी जबरदस्त खेळ करत हा तरुण “हिंद केसरी” पण झाला. विजयी घोडदौड काय असते. जोश काय असतो. खेळ काय असतो याचं उदाहरण म्हणजे हरिश्चंद्र बिराजदार. त्यांनी १९७० साली स्कॉटलंड मधील एडिंबरा येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णबाजी मारत साता समुद्रापार कीर्ती नेली. 

त्या काळी दिल्लीच्या नेत्रापाल नावाच्या पैलवानाचा मोठा दबदबा होता. महाराष्ट्रात हरिश्चंद्र बिराजदार हे नाव धुमाकूळ घालत होते. अशाच काळात या दोन्ही कुस्ती क्षेत्रातील नामवंत पैलवानांची कुस्ती १९७१ ला झाली. या ठिकाणी दिल्लीच्या नेत्रापाल या पैलवणानला अस्माना दाखवत “रुस्तम – ए – हिंद” या पुरस्काराला गवसणी घातली. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत कुस्ती मध्ये हरिश्चंद्र बिराजदार हे नाव ब्रँड झालेलं होते. 
मात्र महाराष्ट्रातील जनतेने बेळगाव येथे झालेल्या कुस्तीच्या नंतर हरिश्चंद्र बिराजदार मामा हे नाव कुस्ती प्रेमींनी हृदयावर याच कुस्ती नंतर गोंदुन घेतले. ही कुस्ती सतपाल विरूद्ध हरिश्चंद्र बिराजदार अशी झाली होती. आजही हा कुस्तीच्या चर्चा कुस्तीच्या आखाड्यात आवर्जून होत असते. आज अशाच महाराष्ट्रातील नामवंत “रुस्तम – ए – हिंद” पैलवान हरिश्चंद्र बिराजदार यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

संपादन : गणेश शिंदे सरकार

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here