मुंबई :
येत्या काही महिन्यात बिहारमध्ये निवडणुका होणार आहेत. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बिहार निवडणुकांच्या संदर्भातील एक मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे. भाजपमधील अंतर्गत कुरघोडीचे बळी ठरलेले माजी मंत्री व जेष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. खडसे म्हणाले की, महाराष्ट्रात जे राजकारण झालं, ते बिहारमध्ये होऊ नये. याचं तिकीट कापायचं, त्याचं तिकीट कापायचं. याला पाडण्यासाठी प्रयत्न करायचे, त्याला पाडण्यासाठी प्रयत्न करायचे, असं बिहारमध्ये घडू नये हीच अपेक्षा आहे.
पुढे बोलताना त्यांनी बिहार निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छाही दिल्या. महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यापासून खडसेंना विविध कारणांनी डावलण्यात आले. ज्या खडसेंनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात भाजपला पोहोचवले त्याच खडसेंना विधनासभा तिकीटसुद्धा नाकारले गेले. पुढे खडसेंचे मन राखण्यासाठी त्यांच्या कन्येला तिकीट दिले गेले मात्र त्यांचाही पराभव झाला. हा पराभव करण्यामागेही भाजपचे काही नेते व कार्यकर्ते होते, असे बोलले जाते. गेल्या काही वर्षांपासून खडसे पक्षात नाराज आहेत. तसेच ते वेळोवेळी पक्षाला घरचा आहेरही देत असतात.
संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी