माध्यमांनी ताळतंत्र ठेऊन आणि पत्रकारितेची नितीमुल्ये जोपासत संयम ठेऊन बातमीदारी आणि कार्यक्रम प्रसिद्ध करायचे असतात. याचेच भान सुटलेल्या रिपब्लिक टीव्हीचे न्यूज अँकर अर्णब गोस्वामी यांना दिल्ली उच्च न्यायालयाने फटकारले आहे.
काँग्रेस नेते शशी थरूर यांची दिवंगत पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या खून प्रकरणाचा तपास स्वतःहून केल्याचे भासवत मिडीया ट्रायल करीत असलेल्या गोस्वामी यांना न्यायालयाने समज दिली आहे. न्यायालयाने याबाबत म्हटले आहे की, माध्यमांनी कोणत्याही बातम्या प्रसिद्ध करू नयेत किंवा कराव्यात याबद्दल न्यायालय काहीही म्हणणार नाही. मात्र, बातमी प्रसिद्ध करतानाची भाषा योग्य असावी. पोलिसांच्या तपासात कुठेही बाधा येणार नाही याचे भान ठेऊन बातमीदारी करण्याची आवश्यकता आहे. त्याचे भान ठेऊन यापुढे वार्तांकन आणि ब्रॉडकास्टिंग करावे.
जस्टीस मुक्ता गुप्ता यांनी म्हटले आहे की, पत्रकारांनी क्रिमिनल ट्रायल हा कोर्स करूनच पत्रकारिता करण्याची आवश्यकता आहे. कोन्हालाही गुन्हेगार ठरवण्याचा अधिकार न्यायालयाकडे आहे. अशावेळी टीव्ही वाहिनीने शशी थरूर यांना गुन्हेगार म्हणून जाहीर करण्याची घाई करू नये. माध्यमांनी कोणतेही पुरावे असतील तर त्यानुसार बातमीदारी करावी. मात्र, गुन्हेगार जाहीर करण्याची त्यांची जबाबदारी नाही. कोर्टात सुनावणी होऊन संबधित खटल्याचा निकाल लागल्यावरच कोण गुन्हेगार आहे किंवा नाही हे समाजात असते. त्यामुळे पत्रकारांनी आपली भाषा सुधारावी आणि योग्य पद्धतीने काम करावे.
सध्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधातही टीव्ही अँकर अर्णब गोस्वामी यांनी आक्रस्ताळी भाषा वापरली आहे. एकूण कोणत्याही बातमीमध्ये आपणच न्यायालय असल्याच्या अविर्भावात हे अँकर अर्णब गोस्वामी बोलत असतात. त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने फटकारले आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे