मोदी सरकारच्या ‘त्या’ तीन निर्णयांच्या विरोधात शेतकरी आक्रमक; आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने घेतलेल्या ३ निर्णयामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचा दावा करून भारतीय किसान संघाच्या शेतकऱ्यांनी त्यास विरोध दर्शवला आहे. फ़क़्त लेखी किंवा तोंडी विरोध न दर्शवता हजारो शेतकऱ्यांनी याकडे लक्ष वेधण्यासाठी कुरुक्षेत्र येथे रास्तारोको आंदोलन केले. त्यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याच्या बातम्या येत आहेत.

मोदी सरकारने तीन वेगवेगळे निर्णय घेतले आहेत. पहिल्या निर्णयानुसार आता शेतकरी फ़क़्त मार्केट यार्डमध्ये नाही, तर कुठेही आणि कोणालाही आपला शेतमाल विकू शकणार आहे. तर, दुसऱ्या निर्णयानुसार डाळी, बटाटा, कांदा, खाद्यतेल आणि इतर अन्नधान्य यांना आवश्यक वस्तू नियमातून सूट देण्यात आलेली आहे. तर, तिसऱ्या निर्णयामुळे शेतकऱ्यांची शेती कंत्राटी पद्धतीने कशी मोठ्या कंपन्या व इतरांना देता येईल याची नियमावली बनवण्यात येत आहे. यातील पहिल्या व तिसऱ्या निर्णयाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे.

‘किसान बचाव, मंडी बचाव’ अशा घोषणा आंदोलक शेतकऱ्यांनी दिल्या. तसेच कलम १४४ चे उल्लंघन करून एकत्र जमलेल्या शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप कुरुक्षेत्र येथील प्रशासन व हरियाना पोलिसांनी केला आहे. तर, शेतकऱ्यांनी कुठेही दगडफेक केलेली नसताना मोदी व मुख्यमंत्री यांच्या आदेशाने पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. एकूणच यानिमिताने ऐन करोना संकटात उत्तर भारतात केंद्र सरकार विरुध्द शेतकरी असा संघर्ष पेटला आहे.

संपादन : माधुरी सचिन चोभे

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here