कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आणखी एक व्हीडीओ ट्विटरवर टाकून लॉकडाऊन काळात देशातील गरिबांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. त्यांनी म्हटले आहे की, या काळात २१ दिवसांमध्ये करोना संपवण्याची भाषा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांना संपवण्याचा विडा उचलला होता.
२ मिनिट ८ सेकंद लांबीच्या या व्हीडीओमध्ये राहुल गांधी यांनी विविध संस्था आणि सर्वेक्षण एजन्सी यांचा हवाला देऊन मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, आतातरी मोदींनी समजून घ्यावे की देशातील गरिबांना न्याय योजनेसारख्या योजनेची गरज आहे. कोट्यावधींचे रोजगार जाण्यासह लाखो MSME म्हणजे छोटे व लघु उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यांना मदत करण्याची ही वेळ आहे.
गरीब व छोट्या व्यावसायिकांना मदत करण्याऐवजी या काळातही केंद्र सरकारने १.४५ लाख कोटी रुपये इतकी करमाफी करून टाकली. मोदींचे सरकार हे गरिबांचे नसून श्रीमंतांचे आहे. गरिबी नाही, तर गरिबांना संपवण्याचे धोरण ठेऊन हे सरकार काम करीत आहे. लघु उद्योगांना किमान १ लाख कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची गरज आहे. फ़क़्त घोषणाबाजी करून काहीही होणार नाही. ही वेळ देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी ठोस भूमिका निभावणाऱ्या गरीब, कष्टकरी, शेतकरी, मजूर आणि छोट्या उद्योग-व्यावसायिकांना मदत करण्याची आहे. त्यावर मोदींचे सरकार काहीही करोत नाही हे दुर्दैव आहे, असेही राहुल गाणी यांनी म्हटले आहे.
संपादन : सचिन पाटील