TV9 चे पत्रकार पांडुरंग रायकर यांचे करोनामुळे निधन; वाचा कोणत्या शब्दांत मित्रांनी वाहिली त्यांना श्रद्धांजली

पुणे :

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीचे पुणे प्रतिनिधी आणि शेती-मातीची जाण असलेले पत्रकार पांडुरंग रायकर यांचे आज पहाटे निधन झाले. कोरोनामुळे बुधवारी पहाटे साडेपाच वाजता निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे आणि आई- वडील असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे सोशल मिडीयामध्ये अनेकांनी आपल्या दु:खाला वाट मोकळी करून दिली आहे.

मित्रांच्या गोतावळ्यात रमणारे आणि सामन्यांच्या हक्कांसाठी आग्रहाने बातमीदारी करणाऱ्या पांडुरंग रायकर यांच्या निधनाबद्दल व्यक्त केलेल्या काही प्रातिनिधिक पोस्ट अशा आम्ही देत आहोत. सोमनाथ गर्जे यांनी लिहिले आहे की, आजचा दिवस खूपच वाईट बातमी घेऊन आला राव… TV9 चा पुण्यातील प्रतिनिधी पांडुरंग रायकरने कोरोनामुळं जगाचा निरोप घेतला. पांडुरंगा लई लवकर गेलास यार तू… आपल्या गावाकडचा माणूस भेटला की प्रत्येकालाच आनंद होत असतो… तसं पांडुरंग पुण्यात आल्यानंतर मला झाला होता. मला आजही आठवतंय नगरमधून पुण्यात आल्यानंतर मला हक्काने फोन करुन तू भेटलास. पत्रकार संघात आपण जवळपास तास-दिड तास गप्पा मारल्या. ‘काही अडचण आली तर कधीही फोन करेन फक्त फोन घ्या..’ म्हणणारा किती निर्मळ मनाचा होतास तू. प्रत्यक्षात मात्र अशा कोणत्याही अडचणीच्या वेळी तू फोन केला नाहीस. तुझ्यात होतीच तेवढी गुणवत्ता. सगळ्यांशीच तुझे सलोख्याचे संबंध होते. पटकन कुणालाही आपलंसं करून घेणारा तुझा शांत, संयमी स्वभाव. चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य. चिकाटी आणि मेहनत हे तर मातीतले अंगभूत गुण तुझ्यात ठासून भरलेले. त्याला तू अभ्यासाचीही जोड दिली. याच बळावर पुण्यात चांगला स्थिरस्थावर होत असतानाच अचानक सगळ्यांना सोडून जाणं कसं जमलं रे तुला? तुझ्याबाबतीत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याची वेळ इतक्या लवकर येईल, असं चुकूनही कुणाला वाटलं नाही. पण नियतीने ती आमच्यावर आणलीय. तुझ्या आत्म्यास चिरशांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली! (पत्रकारितेतल्या सगळ्या मित्रांनो काळजी घ्या रे स्वतःची. दिवस लई वाईट आहेत. ‘डेडलाईन’च्या धावपळीत आपल्या आयुष्याची डेडलाईन संपायला नको)

ब्रिजमोहन पाटील यांनी उद्वेगाने लिहिले आहे की, मुर्ख लोकांनी अर्धवट तयारी असलेले पुण्यात जंबो कोवीड रुग्णालय (सांगडा उभा केला) सुरू केले. यामुळे योग्य उपचारा अभावी TV9 चा आमचा मित्र पांडुरंग रायकर चा मृत्यू झाला. राज्य सरकार आणि पुणे मनपावर टीका करून काही होणार नाही. उलट शनिवारवाड्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महापौर सगळे आयएएस अधिकारी जाहीर सत्कार केला पाहिजे. तुमच्या चमकोगिरीसाठी पूर्ण तयारी नसताना हाॅस्पीटल सुरू करून, रोज एक कुटूंब उद्धव करत आहात. याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन. अकड्यांचा खेळ करणार्या तुमच्या सारख्या लोकांना हा केवळ एक मृत्यू आहे. संध्याकाळी टोटल नंबर जाहीर केला की विषय संपतो. पांडूरंगा साॅरी. भावपूर्ण श्रद्धांजल..

संपादन : सचिन मोहन चोभे

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here