‘ती’ म्हणजे ब्रिटिशांची ह्रदय युवराज्ञी; वाचा ‘तिच्या’वरील महत्वाचा लेख

प्रिन्सेस डायना म्हणजे एक दंतकथा बनून गेलेले सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व. अजूनही त्यांच्याबद्दलच्या किस्स्यांना चवीने चघळले जाते. व्यक्तिस्वातंत्र्याचा मान असावा असे मानणारी आणि त्यासाठी युवराज्ञीपद सोडण्याची धमक असलेली ही परीसारखी दिसणारी सुंदर महिला अनेकांना प्रेरणादायी वाटली होती. नव्हे, त्यांची प्रेरणा अजूनही अनेकजण घेतात. १३ ऑगस्ट याच दिवशी २३ वर्षांपूर्वी प्रेन्सेस डायना यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यावर ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांनी फेसबुक पेजवर लिहिलेला लेख आम्ही वाचकांसाठी प्रसिद्ध करीत आहोत.

लंडनमध्ये नोकरीनिमित्त माझे वास्तव्य होते, तेव्हाची गोष्ट. कानात शिशाचा गरम रस कुणी ओतावा तशी ती दाहक बातमी. ‘प्रिन्सेस गेली’. कुणी तरी पुटपुटलं आणि बघता बघता वाऱ्यासारखी बातमी पसरली…

रस्त्यांवर निरव शांतता पसरली. दुकानांची शटर्स खाली आली. हे सारं काही लोक स्वयंप्रेरणेनेच करत होते. माझ्यासारख्या विदेशींना सकाळच्या पावापासूनचा प्रश्न होता. फ्रिजमधलं दूध पिऊन तसाच निघालो, तर सारं लंडनच जणु एका दिशेने चालत होतं. सर्वांच्या माना खाली आणि तोंडातून चकार शब्द नाही..! सर्व रस्ते बर्किंगहॅम पॅलेसच्या दिशेने वाहात होते…!

ब्रिटिश राजघराण्यात विवाह झाल्यामुळे ब्रिटनचे युवराज्ञीपद मिळूनही बंडखोरी करून ‘व्यक्तिस्वातंत्र्य’ जपण्यासाठी राजपुत्र चार्ल्सला घटस्फोट देत ‘युवराज्ञी’पदाचाही त्याग करणाऱ्या प्रिन्सेस डायनाचा अपघाती गूढ मृत्यू झाला, त्या वेळचा हा प्रसंग!

त्या घटनेला आज २३ वर्षे झाली.

डायना आणि तिचा प्रियकर डोडी फ्रान्समध्ये प्रवास करत असताना पॅरिसमधील एका लांबलचक बोगद्यात त्यांच्या कारला अपघात झाला. त्यात डोडी फायेद हा पश्चिम आशियातील उद्योगपती व डायना यांचा मृत्यू झाला.

  या अपघातामुळे सारे जग सुन्न झाले. ब्रिटिश राजघराण्याविरूद्धचा ब्रिटिश जनतेचा रागही अनावर होऊ लागला. अखेर डायनाला ‘श्रद्धांजली’ म्हणून बर्मिंगहॅम राजवाड्यावर फडकणारा राजघराण्याचा ध्वजही अर्ध्यावर आणणे भाग पडले.

  डायनाची लोकप्रियता इतकी अफाट झाली होती की ६ सप्टेंबरला तिचे अंत्यविधी होईपर्यंत बर्मिंगहॅम पॅलेसच्या बाहेर लोकांची अहोरात्र प्रचंड गर्दी झाली होती. फुले व पुष्पचक्रांचे खच पडले होते व नाक्यानाक्यावर हजारो मेणबत्त्या तेवत होत्या.

  असे म्हणतात की प्रिन्स चार्ल्सच्या विवाहबाह्य संबंधांमुळे डायना व त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. नंतर ती राजवाडा सोडूनही गेली. अखेर तिने घटस्फोट देऊन राजघराण्याचा त्याग करण्याचा निर्णय घेतला व तो अंमलातही आणला. ब्रिटिश राजघराण्यात घटस्फोटाचा हा पहिलाच प्रसंग!

  राजघराण्यात असताना व ते सोडल्यानंतर डायना सामाजिक कार्य करतच होती. आफ्रिकेत वेगवेगळ्या कामांसाठी डोंगर-टेकड्या फोडण्यासाठी सुरुंग फोडले जात. त्यात शेकडो कामगारांचे जीव जात व हजारोंना कायमचे अपंगत्व येई. डायनाने याविरुद्ध मोहिम उघडून जनजागृती केली व ही पद्धत बंदही केली.

  डायनाने अनाथालयात वाढणाऱ्या बालकांच्या समस्या, एड्सचे रुग्ण व कुष्टरोग पीडित यांच्यासाठीही अथक काम केले. त्यामुळे तिने युवराज्ञीपद सोडले तरी ती जनतेच्या ‘ह्रदयाची राणी’ असे तिचे वर्णन होऊ लागले.

  डायनाचे वैयक्तिक आयुष्यही अनेक वाद व शंकांनी वेढलेले होते. ज्यावेळी ती प्रिन्स चार्ल्सच्या विवाहबाह्य संबंधांना विरोध करत होती, त्याच काळात तिचे नावही एका नौदल अधिकाऱ्याशी जोडले गेले होते. ‘मी त्याच्या प्रेमात होते’, असे तिनेही बीबीसीच्या मुलाखतीत म्हटले होते.

  तिचे चार्ल्सबरोबरचे संबंध दुरावू लागल्यानंतरही तिचे काही पुरुषांशी संबंध येत राहिले असे म्हटले जाते. डोडी हाही असाच तिच्या आयुष्यात आला.

  जगभरच्या गाॅसिप पत्रकारांनी कायमच तिचा पिच्छा पुरवला. पॅरिसमध्ये फोटोग्राफर्सचा पाठलाग चुकवण्याच्या प्रयत्नात भरधाव गाडी चालवताना ड्रायव्हरचा ताबा सुटला व ‘तो’ दुर्दैवी अपघात घडला.

  डायनाचे जगणे जसा जगाच्या व माध्यमांचा कुतुहलाचा विषय होता, तसेच तिच्या मृत्यूचे गूढही आजतागायत कायम आहे. तो ‘अपघात’ होता की ‘घातपात’ या विषयी आजही ब्रिटनमध्ये चर्चा चालतात.

  डायनाचा अंत्यविधीही ह्रद्य होता. हजारो साश्रू ब्रिटिश नागरिकांच्या उपस्थितीत लंडनच्या वेस्टमिनिस्टरॲबेमध्ये तिच्यासाठी अखेरची प्रार्थना झाली. त्यावेळी प्रसिद्ध गायक व डायनाचे जुने मित्र एल्टन जाॅन यांनी ‘Candle in the wind’ ही खस डायनासाठी बदललेली कविता सादर केली. तिथे उपस्थित हजारो लोकांबरोबरच टीव्हीवर हा कार्यक्रम लाईव्ह पाहणाऱ्या करोडो लोकांचे मनाचे बांध त्यामुळे फुटले.
  आजही ती कविता आठवते :

  Goodbye England’s rose
  May you ever grow in our hearts
  You were the grace that placed itself
  Where lives were torn apart
  You called out to our country
  And you whispered to those in pain
  Now you belong to heaven
  And the stars spell out your name
  And it seems to me you lived your life
  Like a candle in the wind
  Never fading with the sunset
  When the rain set in
  And your footsteps will always fall here
  Along England’s greenest hills
  Your candle’s burned out long before
  Your legend ever will !

  – भारतकुमार राऊत

  ब्रिटिशांची ह्रदय युवराज्ञीलंडनमध्ये नोकरीनिमित्त माझे वास्तव्य होते, तेव्हाची गोष्ट. कानात शिशाचा गरम रस कुणी ओतावा…

  Posted by Bharatkumar Raut on Sunday, August 30, 2020

   LEAVE A REPLY

   Please enter your comment!
   Please enter your name here